भाविकांना ‘प्रसादा’च्या जेवणाचे पार्सल पाठविण्यास जैन मंदिरांना मिळाली मुभा

Bombay HC
  • पवित्र ‘अयम्बिल तप’ पर्वात हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : मुंबईतील ६० आणि पुणे व नाशिकमधील प्रत्येकी तीन जैन मंदिरांच्या ट्रस्टना ‘अयम्बिल तप’ या जैन समाजाच्या (Jain Community) पवित्र पर्वाच्या काळात मंदिरात शिजविलेल्या प्रसादाच्या जेवणाची पार्सल्स भाविकांना पाठविण्याची मुभा उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिली.

जैन समाजाचे ‘अयम्बिल तप’ हे पवित्र पर्व सोमवार दि. १९ एप्रिलपासून सुरू होत असून ते २७ एप्रिलपर्यंत चालेल. या पर्वकाळात प्रसादाचे जेवण मंदिरांमध्ये शिजविले जाते व तेथील भोजनालयांमध्येच ते भाविकांना वाढले जाते. परंतु कोरोना (Corona) महामारीमुळे सर्व धार्मिक स्थळे सरकारने बंद केलेली असल्याने ही नेहमीची धार्मिक परंपरा पाळणे शक्य नसल्याने न्यायालयाने ही पर्यायी व्यवस्था करण्याची मुभा दिली आहे.

‘श्री आत्मन कमल लब्धीसुरिश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्ट’ आणि ‘शेठ मोतीशा रिलिजियस अ‍ॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट’ या मुंबईतील दोन व नाशिक आणि पुण्यातील जैन मंदिरांच्या काही ट्रस्टनी केलेल्या याचिकांवर न्या. सुरेश गुप्ते व न्या. अभय आहुजा यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने हा निकाल दिला. कोणत्याही परिस्थितीत प्रसादाच्या जेवणाची ही पार्सल्स नेण्यासाठी भाविकांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही, असे न्यायालयाने आवर्जून नमूद केले.

न्यायालयाने म्हटले की, मंदिरांच्या भटारखान्यात प्रसादाचे जेवण शिजविले जाईल. ज्यांनी अशा जेवणासाठी आधीपासून ऑर्डर नोंदविली आहे त्यांना प्रसादाची पार्सल्स पाठविण्यासाठी प्रत्येक मंदिर जास्तीत जास्त सात स्वयंसेवक नेमू शकेल. पार्सल भाविकांना त्यांच्या घरी नेऊन देण्यासाठी सरकारने ज्यांना मुभा दिली आहे अशा व्यावसायिक वितरण कंपन्यांची मदत घ्यावी लागेल.

प्रसादाचे जेवण शिजविताना व त्याचे वितरण करताना सरकारने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे कसोशीने पालन करण्याची जबाबदारी मंदिरांच्या व्यवस्थापनांवर असेल, असेही नमूद केले गेले.

आधी फक्त मुंबईतील या दोन मंदिर ट्रस्टनी याचिका केल्या होत्या. सरकारने हॉटेलांना जशी ग्राहकांना जेवणाची पार्सल्स देण्याची सूट दिली आहे तशीच सूट आम्हालाही द्यावी, अशी त्यांची मूळ मागणी होती. परंतु पार्सल नेण्यासाठी मंदिरांपाशी भाविकांची गर्दी जमेल हे लक्षात घेऊन ‘स्विगी’ आणि ‘झोमॅटो’ या कंपन्या जशी आधी ऑर्डर नोंदवून घेऊन दिलेल्या पत्त्यावर पार्सल पोहचवितात तशी व्यवस्था करण्याचा पर्याय चर्चेतून मान्य झाला. अशी व्यवस्था करण्यास न्यायालय राजी आहे याची कुणकुण लागल्यावर मुंबईतील इतरही जैन मंदिरांच्या ट्रस्टनी व नाशिक व पुणे येथील जैन मंदिरांनीही तशाच याचिका केल्या. त्या सर्वांवर वरीलप्रमाणे एकत्रित निकाल देऊन याचिका निकाली काढल्या गेल्या.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button