या चित्रपटाच्या उत्पन्नाचा विक्रम अजूनही कोणी मोडू शकलेला नाही

Jai Santoshi Maa

मल्टीप्लेक्स (Multiplex) आल्यापासून चित्रपटांचा व्यवसाय फक्त तीन दिवसांवर आला आहे. तीन दिवसात चित्रपट कोट्यावधींच्या उड्या घेत असतो आणि मोठे कलाकार आपल्या चित्रपटाने कसा 200, 300 कोटींचा व्यवसाय केला हे सांगत असतात. 100-150 कोटी रुपये खर्च करून एखाद्या चित्रपटाने 300-500 कोटी रुपये कमवले तर तो चित्रपट सुपरहिट असे म्हटले जाते. त्यातही मल्टीप्लेक्सचे तिकीटही 200 रुपयांपासून पुढे असते. त्यामुळे शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन दिवसात जास्तीत जास्त कमाई करण्याचा प्रयत्न कलाकार आणि निर्मात्यांचा असतो. यासाठी मग दिवसाला पाच पाच- सहा सहा शोही लावले जातात. मोठा वीकेंड असेल आणि चांगला चित्रपट असेल तरच तो 300 – 400 कोटींपर्यंत जातो. बाहुबलीने 500 कोटींचा व्यवसाय केल्याचे सांगितले जाते. पण 47 वर्षांपूर्वी आलेल्या एका चित्रपटाच्या कमाईचा विक्रम अजूनही कोणीही मोडू शकलेला नाही.

आता तुम्ही म्हणाल असा कोणता चित्रपट होता जो 45 वर्षांपूर्वी आला होता आणि ज्याच्या उत्पन्नाच्या विक्रमाला अजूनपर्यंत कोणीही गवसणी घातलेली नाही. उत्पन्नाचा विक्रम करणारा हा चित्रपट भव्य दिव्य नव्हता, ऐतिहासिक नव्हता किंवा खर्चिकही नव्हता. किंवा यात मोठे कलाकारही नव्हते. अत्यंत साधारण आणि पौराणिक कथेवर आधारित या चित्रपटाचे नाव आहे जय संतोषी मां. चित्रपटाचे नाव वाचून तुम्हाला धक्काच बसला असेल. सतराम रोहरा निर्मित आणि विजय शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात कानन कौशल, भारत भूषण, आशिष कुमार, लीला मिश्रा अभिनीत या चित्रपटात अनिता गुहाने संतोषी मातेची भूमिका साकारली होती. कानन कौशलने सत्यवती ही मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटाला संगीत दिले होते सी. अर्जुन यांनी. जय संतोषी मां आणि रमेश सिप्पी यांचा मल्टीस्टारर अॅक्शनपॅक्ड चित्रपट शोले एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. शोलेच्या तुलनेत हा चित्रपट म्हणजे किस खेत की मुली. पण या चित्रपटाने शोलेपेक्षा जास्त कमाईचा विक्रम केला होता.

ही बातमी पण वाचा : तरुण वयातच कोट्यावधींच्या मालकीण झाल्या या नायिका

आज बॉलिवुडमध्ये (Bollywood) सर्वाधिक कमाई केलेल्या चित्रपटांमध्ये आमिर खानच्या दंगलचा उल्लेख केला जातो. 70 कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाने संपूर्ण जगभरात 2100 कोटींचा व्यवसाय केला आहे. केवळ भारतात 542 कोटी रुपये कमवले होते. त्यानंतर प्रभास अभिनीत बाहुबलीचा उल्लेख करावा लागेल. 150 कोटी रुपये बजेट असलेल्या बाहुबली 2 ने जगभरात 1820 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानंतर 90 कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या बजरंगी भाईजान ने 970 कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याने त्याचा क्रमांक लागतो. 85 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या आमिर खान (Amir Khan) अभिनीत पीके चित्रपटानेही भारतात 490 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. रजनीकांत अभिनीत जवळ जवळ 500 कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या 2.0 चित्रपटानेही 900 कोटींचा व्यवसाय केला होता. प्रभासच्याच बाहुबली 1 साठी 180 कोटी रुपये खर्च आला होता आणि या चित्रपटाने 650 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

हे सगळे आकडे वाचून जय संतोषी मां (jai santoshi ma) चित्रपटाचा उत्पन्नाचा विक्रम असा काय आहे जो आजपर्यंत कोणीही मोडलेला नाही असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच उद्भवला असेल. चित्रपटाचे बजेट आणि त्याने बॉक्स ऑफिसवर केलेल्या कमाईचा आकडा पाहावा लागेल. जय संतोषी मां हा चित्रपट फक्त पाच लाख रुपयात तयार झाला होता. आणि या चित्रपटाने बजेटपेक्षा 100 पट जास्त म्हणजे 5 कोटी रुपयांची कमाई 1975 मध्ये केली होती. बजेटपेक्षा 100 पट जास्त कमाई आजवर कोणताही चित्रपट करू शकलेला नाही. गोल्डन ज्युबली म्हणजे 50 आठवडे चाललेल्या या चित्रपटाच्या काळात मल्टीप्लेक्स नव्हते आणि सिंगल स्क्रीनमध्ये तिकीटाचे दरही एक रुपया, दीड रुपया असे होते. चांगल्या चित्रपटगृहात पाच रुपयांपर्यंत तिकीट होते. असे असताना या चित्रपटाने बजेटच्या 100 पट कमाई केली होती. आजवर हा विक्रम कोणत्याही चित्रपटाने मोडलेला नाही. आणि भविष्यातही कोणी मोडेल असे वाटत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER