नंबर वनकडे जॅकलीन फर्नांडिसची घोडदौड

Jacqueline Fernandez

बॉलिवूडमध्ये (Bollywood) सध्या जुन्या नायिकांसोबतच अनेक तरुण आणि नव्या नायिका असतानाही जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) मात्र या सगळ्या नायिकांच्या पुढे जात असल्याचे दिसत आहे. तिची सध्या सुरू असलेली घोडदौड पाहता ही लवकरच नंबर वनवर पोहचेल असे म्हटले जात आहे. मूळची श्रीलंकन असलेल्या आणि मॉडेलिंग करीत असतानाच २००९ मध्ये रितेश देशमुखसोबत ‘अलादीन’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. आणि केवळ ११ वर्षांत ती बॉलिवूडमधील सगळ्या मोठ्या हीरोंसोबत तर दिसलीच, नव्या पिढीच्या म्हणजेच वरुण धवनच्या नायिकेच्या भूमिकेतही ती दिसली होती.

गेल्या काही दिवसांत जॅकलीनने नवे चित्रपट साईन करण्याचा धडाका लावला आहे. सर्वप्रथम जॅकलीनने यशस्वी निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ चित्रपट पदरात पाडून घेतला होता. रोहित शेट्टी ‘सिंबा’नंतर रणवीर सिंहला घेऊन ‘सर्कस’ चित्रपट करणार आहे. यातील नायिकेच्या भूमिकेसाठीही अनेक जणींनी फिल्डिंग लावली होती. पण त्या वेळीही जॅकलीननेच बाजी मारली होती. साजिद नाडियाडवाला ‘किक’च्या यशानंतर सलमानसोबत ‘किक-२’ ची निर्मिती करणार आहे. यासाठीही सलमानच्या नायिकेच्या भूमिकेत जॅकलीनलाच साईन करण्यात आले आहे.

आणि आता जॅकलीनने ‘बच्चन पांडे’ साईन केला आहे. साजिद नाडियाडवाला निर्मित अक्षयकुमार अभिनीत ‘बच्चन पांडे’ चित्रपटात कृती सेनन नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात आणखी एका नायिकेची गरज असल्याने ती जागा कोण घेईल असा प्रश्न बॉलिवूडमध्ये विचारला जात होता. अनेक मोठ्या नायिकांची नावेही समोर येत होती. अनेक नायिकांनी साजिदकडे कामासाठी फीलरही पाठवले होते.

पण त्या सगळ्या जणींवर मात करीत जॅकलीनने हा चित्रपट आपल्या पदरात पाडून घेतला आहे. या चित्रपटांसोबतच जॅकलीन ‘अटॅक’ आणि सैफसोबत ‘भूत पोलीस’ चित्रपटही करीत आहे. पुढील काही दिवसांत जॅकलीन आणखी एक-दोन चित्रपट साईन करणार असल्याचेही सांगितले जात आहे. एकूणच जॅकलीन सलमान खान, अक्षयकुमार, रणवीर सिंह या स्टार्ससह काम करीत असल्याने तिची घोडदौड नंबर वनकडे चालल्याचे बॉलिवूडमध्ये म्हटले जाऊ लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER