जे.पी. नड्‌डा यांची 20 जानेवारीला भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

नवी दिल्ली :- भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा येत्या 20 जानेवारी रोजी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती होणार असून ते या पदासाठी अर्ज दाखल करतील. त्यांच्याविरोधात कोणीच नसल्याने त्यांची सर्वसंमतीने निवड होणे निश्चत आहे. जे पी नड्डा अध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या कार्यकर्त्यांना भाजप मुख्यालयात मार्गदर्शन करतील. नड्डा यांच्याकडे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 80 पैकी 62 जागा जिंकल्या होत्या.

सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितिन गडकरीसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्री, राज्यांचे प्रदेश अध्यक्ष जेपी नड्डांच्या नावाचा प्रस्ताव मांडतील. अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर येत्या 20 जानेवारील जेपी नड्डा यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाईल. परंपरेनुसार भाजप अध्यक्षांची निवड सर्वानुमते केली जाते.

मतदारांची यादी तयार करण्याचे काम निवडणूक प्रभारी राधामोहन सिंह यांची टीम करत आहे. अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया आज पूर्ण होईल. नड्डा यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर पक्षाचा उपाध्यक्ष आणि सचिवाची निवडही केली जाईल. मागील काही दिवसांपासून भाजप संघनात्मक मोर्चे बांधणीच्या कामात व्यस्त आहे. जेपी नड्‌डा राज्यसभा खासदार आणि भाजपच्या संसदीय बोर्डाचे सचिव आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गृह मंत्री बनल्यानंतर जून 2019 मध्ये नड्डा यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली होती.