राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे : सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar

मुंबई :- जळगाव येथील वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास लावण्यात आला. आज या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले. आमच्या आयाबहिणींची थट्टा होत असेल, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच एक मार्ग आहे. सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, असा इशारा भाजप (BJP) नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिला. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुनगंटीवार यांच्या मागणीवर आक्षेप घेत त्यांचे वाक्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. संबंधित वाक्य तपासून त्यांना कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले.

जळगाव येथील एका वसतिगृहात काही तरुणींना विवस्त्र होऊन नृत्य करण्यास भाग पाडले असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. याचा विधानसभेत पडसाद उमटले. हा विषय आमदार श्वेता महाले यांनी काढला. पोलीस महिलांचे रक्षक आहेत. पण तेच महिलांवर अन्याय करत आहेत. महिलांना विवस्त्र नाचवले जात आहे, हे गंभीर असल्याचे महाले म्हणाल्या.

राष्ट्रपती राजवट हाच पर्याय
भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी या प्रकरणावरून प्रचंड संताप व्यक्त केला. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले. “मी संविधानाला मानणारा आहे. संविधानाचे पालन करणारा आहे. पण राज्यात आमच्या आयाबहिणींची होत असलेली थट्टा पाहता, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या आयाबहिणीला नग्न केले जाते, हे महाराष्ट्राला शोभते काय?” सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी मलाच करावी लागेल, असे ते म्हणाले.

मुनंगटीवारांची धमकी
मुनगंटीवारांनी राष्ट्रपती राजवटीच्या मागणीचा इशारा देताच नवाब मलिक यांनी त्यांच्यावर आक्षेप घेतला. “मुनगंटीवार हे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत आहेत. हे लोकांनी निवडून दिलेले सरकार आहे. सरकार हे संख्याबळावर चालते. धमक्या देणे योग्य नाही. हल्लीच्या काळात राजकीय उद्देश ठेवून काम सुरू आहे, त्यामुळे मुनंगटीवार यांचे वाक्य कामकाजातून काढून टाकावे.” अशी मागणी मलिक यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी त्यांची मागणी मान्य करत संबंधित विधान तपासून मुनगंटीवारांचे विधान कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असे सांगितले.

मुनगंटीवार यांचा फडणवीसांकडून बचाव
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुनगंटीवार यांचा वक्तव्याचा बचाव केला. “लोकशाहीत सरकार बरखास्त करू, असे बोलण्याचा सदस्यांना अधिकार आहे. ही केवळ बातमी असती तर समजू शकलो असतो. पण या घटनेची व्हिडीओ क्लिप आहे. त्यामुळे तुम्ही संवेदनशीलतेने या घटनेवर कारवाई करावी, यासाठी ही तळमळ आहे.” असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, जळगावप्रकरणाची चौकशीसाठी चार जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दोन दिवसांत याप्रकरणाची चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सभागृहात दिले.

ही बातमी पण वाचा : भाजपने गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे : नवाब मलिक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER