पंतप्रधान मोदींकडे कोलकात्यात जायला वेळ आहे, पण… – शरद पवार

Sharad Pawar-PM Modi

झारखंड : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन चालू आहे. या चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला जवळजवळ १०० दिवस पूर्ण झाले आहेत; मात्र अद्यापही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेटही घेतलेली नाही. आणि यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांबाबत कुठलाही कळवळा नाही. त्यांना  पश्चिम बंगालची निवडणूक (West Bengal Elections) जास्त महत्त्वाची वाटत आहे. त्यांना परदेशात जाण्यास आणि प्रचारासाठी कोलकात्याला जाण्यास वेळ आहे.

मात्र १०० दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर बसलेल्या आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यास वेळ नाही, अशी घणाघाती टीका पवार यांनी मोदींवर केली. शरद पवार हे आज झारखंड दौऱ्यावर आहेत. यावेळी झारखंडमध्ये (Jharkhand) राज्यस्तरीय कार्यकर्त्यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी संबोधित करताना मोदींवर टीकास्त्र सोडले. देशभरात प्रेम, बंधुभाव वाढेल किंवा तसं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी केंद्राची असते. केंद्रात सत्तेत असलेला  भाजप देशात जातीय द्वेषभावना निर्माण करत आहे. शेतकरी गेल्या १०० दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर बसला आहे. आपल्या हक्कांसाठी तो लढतो आहे; पण केंद्रातील सरकार त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाही. पंतप्रधानांना कोलकात्याला जाण्यासाठी वेळ आहे. तिथल्या पश्चिम बंगाल सरकारच्या विरोधात मोर्चा काढायला वेळ आहे; पण इथे दिल्लीतल्या मोर्चेकरी शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

राहुल द्रविडने ज्यावेळी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला त्यावेळी देशासमोर पुढचा कर्णधार कोण, असा यक्षप्रश्न उभा राहिला होता. नंतर झारखंडचा एक मुलगा, महेंद्रसिंग धोनी त्याचं नाव… सचिन तेंडुलकरने त्याच्या नावाची शिफारस केली आणि पुढे भारतीय क्रिकेट जगभरात लोकप्रिय होण्यासाठी धोनीने कष्ट घेतले, अशी स्तुती शरद पवार यांनी केली. भारतीय क्रिकेटमध्ये मोठे योगदान देणाऱ्या खेळाडूंमध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं नाव अग्रक्रमानं  घ्यावं लागेल. भारताच्या इंग्लंड दौर्‍यादरम्यान राहुल द्रविडने मला सांगितले की, कर्णधारपदाचा त्याच्या खेळावर परिणाम होत आहे आणि त्याला राजीनामा द्यायचा आहे. यानंतर मी सचिन तेंडुलकरला पदभार स्वीकारण्यास सांगितले; पण त्यानेही नकार दिला. त्यानंतर मी सचिनला विचारलं की, संघाचं नेतृत्व कोण करणार? त्यावेळी त्याने धोनीच्या नावाची शिफारस केली. तो म्हणाला, आपल्याकडे एक खेळाडू आहे जो भारतीय क्रिकेट जगभरात लोकप्रिय करू शकतो आणि त्यानंतर धोनीला ही जबाबदारी देण्यात आली, ज्याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेटला जगभरात लोकप्रियता मिळाली. एक अढळ स्थान मिळालं, असं शरद पवार म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER