लाइक्स का जमाना है !

It's time for likes

फोमो, (फीअर ऑफ मिसिंग आऊट) हा शब्द प्रत्येकाने ऐकलेलाच असतो. आपल्यापैकी बरेच जण काही वेगवेगळ्या प्रमाणात याची शिकार बनतातही . याला कारण सोशल मीडिया! (Social Media) यामुळे दुसऱ्याच्या व्यक्तिगत आयुष्यात डोकावून बघण्याची सुंदर खिडकी आपल्याला मिळाली आहे आणि आपोआपच आपले वैयक्तिक आयुष्य कसे छान छान छान आहे, हे दाखविण्याची अहमहमिकाही सुरू झाली आहे.

काय आहे हे प्रकरण ? याची सविस्तर चर्चा याच “मनसंवाद कॉलम “मधल्या 2020 च्या 24 जुलै च्या “फोमोचा महाराक्षस” या लेखामध्ये आपण केली होती. अशी कोणतीही सामाजिक बाब प्रश्न म्हणून जेव्हा उभी राहते, तेव्हा तिचे उत्तर समाजस्थिती बरोबर मानसिकतेतही शोधलं जातं.

बरेचदा दुसऱ्यांचे यश, सौंदर्य, कौतुक, प्रगती ही बघितली की काही लोकांना तसेच लगेच आपल्या वाट्याला यावे असं वाटतं. यातही दोन प्रकार. यापैकी काही लोकांच्या वाट्याला कधी न कधी हे आलेलं ही असतं. पण त्यात त्यांना समाधान नसतं. कुठेतरी सदैव मीच प्रकाशझोतात हवं अशी या लोकांची प्रवृत्ती असते. हे इतरांशी कायम तुलना, स्पर्धा करताना दिसतात, मनात कुढत असतात. माझ्या जवळ काय आहे ? याची त्यांना नीटशी कल्पना नसते. आणि स्वतः कडून असलेल्या अपेक्षांचे वारू कायम उधळलेले असतात . परिणामतः कधी मनाला हवी असलेली शांतता, समाधान मिळू शकत नाही. दुसरा प्रकार म्हणजे काही लोकांना चुकून यातले काहीच जमत नसेल तर ते निराशेची शिकार बनतात, तुलनेची जागा राग, इर्षा, द्वेष अशी प्रवास करू लागते. पूर्वी असं नव्हतं असं नाही! पण दिवस-रात्र सोशल मीडिया प्रमाणे या गोष्टी मनावर आदळत नसत. त्यामुळे हे कधीतरीच घडत असे. आता म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसता भडिमार !

पण सगळ्यांच्याच बाबतीत असं होतच असं नाही. ते का ? तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्तीची स्व संकल्पना, स्व स्वीकृती, आणि स्व आदरभाव ! व्यक्तीच्या विकास अवस्थेमध्ये ती ज्या वातावरणात लहानाची मोठी होते, तिची जडणघडण होते ,त्यावेळी असलेले वातावरण आणि बालक पालक संबंध यावर त्या व्यक्तीचा” स्व “कसा विकसित होतो हे अवलंबून असत.

मानसशास्त्रातील ही संकल्पना सर्वप्रथम विल्यम जेम्स ने मांडली. हिल गार्ड यांनी स्पष्ट केलं की व्यक्तीचे वर्तन, वागणं चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचं असलं तर तिच्या स्व संकल्पनेचा अभ्यास करायला पाहिजे.

ही स्व संकल्पना म्हणजे काय ? तर व्यक्तीची स्व प्रतिमा. व्यक्तीच्या शरीर अवयवान संबंधीचा विश्वास, मानसीक क्षमतेविषयी विश्वास, सामाजिक व भावनिक वर्तनाबद्दल ,वैशिष्ट्यांबद्दलचे मत तसेच प्रेरणा, ध्येय, त्यांची उपलब्धता यांच्या विश्वासातून स्व संकल्पना उभी राहते. थोडक्यात मी नेमका कोण आहे ! याची जाणीव असणे.

या सर्व विषयक कल्पनेतूनच व्यक्तीची स्वप्रतिमा विकसित होते. आपण आपल्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो ?स्वतःबद्दल कसा विचार करतो ?ती प्रतिमा. बरेचदा ही प्रतिमा लोक आपल्याशी कसे वागतात ? विशेषतः आई वडील आणि तरुण आणि प्रभाव टाकण्या इतपत मोठे झाल्यावर लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील? त्यांनी केलेले मूल्यमापन, त्यांच्या अपेक्षा यातून सेल्फ इमेज बनते. एखाद्या मुलाला पालक सतत मूर्ख ,नालायक अशी उधळण करत असतील तर ते मूल स्वतःला मूर्ख समजू लागेलं. पण महत्त्वाची बाब अशी आपल्या स्वप्रतीमेत आपले मित्र, शिक्षक, जोडीदारासोबत आलेल्या अनुभवातून स्वप्रतिमा सुधारता देखील येते. लहानपणी सतत आजारी पडणारी, हाडकुळी, आजूबाजूचं कडून दिसायला फारच अशी कशी म्हणून दुखावलेली, मुलगी पुढे मिळालेल्या वातावरणातून आणि जोडीदाराच्या प्रोत्साहनातून आपला दृष्टिकोन बदलते आणि स्वतःला आवडू लागते.

अशीच एक संकल्पना म्हणजे आदर्श स्व. आपण काय व्हायला पाहिजे ?याबाबत व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षा, नैतिक आदर्श आणि मूल्य. लहानपणी सहसा हा पालकांची बंधना व अपेक्षा यातून मिळवलेला असतो. पण परिपक्वते नुसार अनुभवातून, आपल्या महत्त्वाकांक्षा अपेक्षा आपण ठरवायला हव्यात . परंतु आपण जेव्हा आपल्या महत्त्वाकांक्षा जास्तीच्या, अवास्तव ठेवतो त्यावेळी हा आदर्श स्व मिळविण्यासाठी खूप अडचणी येऊ लागतात.यातून फोमो जन्माला येतो.

मग यातून मार्ग कसा काढता येतो.तर स्व आदर म्हणजे आपल्या बद्दलचे योग्य मूल्यमापन. यश स्व आदर वाढविते तर अपयशाने त्यात घट होते. परंतु समान बुद्धिचातुर्य आणि समान यशाबद्दलची भावना हीसुद्धा स्व आदर्शा नुसार बदलत जाते. उदाहरणार्थ अनिलला वर्गात पहिला नंबर मिळाला म्हणून स्वतः बद्दल छान वाटते, पण स्वप्निलला पण तेवढेच गुण मिळूनही तो नाराज होतो. का ?

कारण त्याने, त्याच्या वर्गातील इतर मुलांच्या गुणांची तुलना केली होती .लोकांच्या अपेक्षा, त्याचे स्वतःबद्दलचे व इतरांबद्दलचे मूल्यमापन आणि वर्तन याने स्व आदर ठरतो. ज्यांचा स्व आदर उच्च असतो ते आत्मविश्वासात, आनंदात असतात. मुख्य त्यांच्या स्वतःच्या शक्तीचा आणि कमकुवतपणाचा वास्तव दृष्टिकोन त्यांना असतो.

फ्रेंड्स, स्व विषयक विविध संज्ञांची ओळख करून घेतल्यावर, गुण दोषांची योग्य जाण, त्यानुसार मर्यादित स्वतःकडून अपेक्षा, स्वतःविषयी चे मत बनविण्यासाठी इतरांच्या मतावर अवलंबून न राहणे, आणि असे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी सुयोग्य बालक-पालक संबंध हे आवश्यक असतात.

आणखीन एक छोटीशी गोष्ट म्हणजे लॉकस ऑफ कंट्रोल ! याचे अंतर्गत आणि बाह्य असे दोन प्रकार आहेत. काही लोकांना यश मिळवण्यासाठी प्रगती करण्यासाठी बाहेरून प्रेरणेची गरज नसते ते अंतर प्रेरित असतात. काही लोकांना बाह्य प्रेरणेची ,शाबासकीची ,लाइक्स मिळवण्याची गरज वाटते ते त्यावरच जगतात, त्याचे कारण आपण बघितले आणि त्यामुळे. हे फोमोच्या आहारी जातात.

एवढ्या मोठ्या जगात हात कुणी तरी माझ्या समोर आणि कुणीतरी मागे असणारच ना? मग स्पर्धा करायची झाली तर स्वतःशीच करावी. आणि नेहमी स्पर्धा कशाला ? करत असलेल्या कामात गुंतून राहिल्यावर जो आनंद मिळतो तो कुणाच्या लाईक्स पेक्षा खूप मोठा असतो. म्हणून स्वतःला या स्पर्धेमध्ये न फेकलेले , सगळ्यात बेस्ट ! नाहीतर मग माझ्या आटोक्याबाहेरची स्वप्न , ती पूर्ण करण्यासाठीची धडपड ही आरोग्यावर परिणाम करणार. एका कुठल्याशा गोष्टीमध्ये कावळी जशी गोरी गोरी पान होण्यासाठी स्वतःला घासत राहते दगडाने व शेवटी रक्तबंबाळ होऊन प्राणास मुकते.

तीच कोकिळा मात्र तेवढीच काळी, पण आपल्या सुरांवर फिदा होऊन सगळ्या वसंत ऋतूच्या काव्यांमध्ये स्थान मिळवतें . फ्रेंडस् ! ” एेल तिरी नांदे सुख , पैल तीरावर दुःख , मधे वाहते जीवन , ऐसे संसाराचे रूप. हे ज्यांना माहिती असते, खेळ महत्वाचा ,हार-जीत नव्हे हे ज्यांना कळते तेच जीवनाचा उपभोग रसिकतेने घेऊ शकतात.

ही बातमी पण वाचा : आजची गरज – भावनिक बुद्धिमत्ता

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button