पवारांचा दोष नाही, सरकारचे निर्माते असल्याने त्यांना बचाव करावा लागेल : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis - Sharad Pawar - Maharastra Today

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि आताचे होमगार्ड प्रमुख परबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बवर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सिंग यांनीच पोलीस सहायक सचिन वाझे यांना सेवेत सामावून घेण्यासाठी निवड केली. त्यांच्या याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पवारांना लक्ष्य केले. शरद पवार हे अर्धसत्य सांगत आहेत. यात त्यांना दोष देणार नाही. ते या सरकारचे शिल्पकार आहेत. निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी ते वाचवण्याची भूमिका घ्यावी लागते, असा टोला फडणवीस यांनी लगावला. ते नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी फडणवीस म्हणाले की, हे सगळं प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचा खुलासा करणारे परमबीर सिंग हे पहिले व्यक्ती नाहीत. यापूर्वी महाराष्ट्राचे डीजी सुबोध जयस्वाल यांनीही या संदर्भातला एक रिपोर्ट राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. पोलिसांच्या बदल्याचे रॅकेट, पैशांची देवाणघेवाण, त्यातील दलाली या संदर्भातील संपूर्ण माहिती तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी सादर केली होती. तो रिपोर्ट मुख्यमंत्र्यांकडे, त्यानंतर गृहमंत्र्यांकडे गेला होता. पण त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.

निवृत्तीला केवळ एक-दीड वर्षे उरलेले असताना सुबोध जयस्वाल यांच्यासारखी व्यक्ती महाराष्ट्र सोडून केंद्रीय सेवेमध्ये जाते. महाराष्ट्राचं पोलीस महासंचालक पद हे देशातील महत्त्वाचं पद मानल जातं. पण ते पद सोडून ते केंद्राच्या सेवेत निघून गेले. याचं कारणच प्रकरण भयानक होतं. पण त्याचा तपास करण्यात आला नाही. महाराष्ट्राच्या इंटिलिजन्सला फार मोठं बदल्यांचं रॅकेट असल्याचं समोर आलं होतं. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तेव्हाच्या कमिशनर इंटिलिजन्स रश्मी शुक्ला यांनी डीजींना त्यासंदर्भात रिपोर्ट सादर केला. त्यांच्यामार्फत एसीएसहोमची परवानगी घेऊन काही फोन त्यांनी सर्व्हिलन्सला लावले. त्यातून जे काही बाहेर पडलं ते धक्कादायक समोर आलं.

मात्र, दुर्दैवाने त्या रिपोर्टवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तत्कालीन आयुक्त इंटिलिजन्स यांच्यावर कारवाई झाली. साधं ऑफिसही त्यांना मिळू नये, असा प्रयत्न करण्यात आला. त्यादेखील आता केंद्राच्या सेवेत गेल्या आहेत. त्या रिपोर्टमध्ये ज्यांची नावे आली होती त्यातील बहुतांश लोकांना त्या त्या ठिकाणी पदस्थापना केलं. म्हणून परबीर सिंग यांनी लावलेला आरोप हा पहिला आरोप नाही.

मी शरद पवार यांची पत्रकार परिषद बघितली. पण सुबोध जयस्वाल, रश्मी शुक्ला यांची बदली नव्हती. त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे जो रिपोर्ट सादर केला होता, त्याच वेळी उचित कारवाई झाली असती तर आज ही वेळ आली नसती. पवारांची पत्रकार परिषद ऐकल्यानंतर मला धक्का बसला. पण त्यांना दोष देता येणार नाही. ते या सरकारचे निर्माते आहेत. निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी ते डिफेंड करण्याची भावना घ्यावी लागते. त्यांनी ज्यावेळी सांगितले वाझे यांना परमबीस सिंग यांनी घेतलं. ते खरंच आहे. परमबीर सिंग यांच्या समितीत अनेक लोक होते. त्या समितीने निर्णय घेतला. त्यानंतर रिइंस्टेट करण्यात आलं. पण रिइंस्टेट केल्यानंतर त्यांना महत्त्वाची जागा देण्यात आली. तेव्हा सरकार झोपलं होतं का? सरकारला, मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना नियम नाही माहिती? सगळ्या महत्त्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच देण्यात आल्या. हे सरकारच्या आशीर्वादाशिवाय झालं?

पवार सांगतात ते खरंय. पण ते अर्धसत्य आहे. परमबीस सिंग यांच्याच समितीने वाझे यांना पदावर घेतले. पण मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आशीर्वादाने त्यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे एपीआय दर्जाचा माणूस महत्त्वाच्या ठिकाणी कसा गेला, असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER