सचिन होमवर्क करुन बोलला असता तर बरे झाले असते!

Sachin Tendulkar - Rihanna

भारतीय खेळाडू सामाजिक प्रश्नांवर, देशातील समस्यांवर सहसा बोलत नाही. अमेरिकेतील क्रीडापटूंप्रमाणे काही भूमिका घेत नाहीत अशी नाराजी अधूनमधून व्यक्त होतच असते. त्यात तथ्य नाही असेही नाही पण आता लाखो नाही, कोट्यवधींच्या गळ्यातील ताईत सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) एका विषयावर आपले मत मांडले आणि प्रचंड वादळ उठले आहे. या वादळाने सचिनची प्रतिमा उजळली की डागाळली हे काळच ठरवेल पण सचिन जे काही बोललाय त्याच्या बाजूने व त्याच्या विरोधात जबरदस्त चर्चा सुरु आहे.

सचिन काय म्हणाला?

सचिनने बुधवारच्या आपल्या व्टिटमध्ये म्हटलेय, “भारताच्या सार्वभौमत्वाबद्दल कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. परकीय शक्ती ह्या दर्शक असू शकतात पण भारताच्या अंतर्गत गोष्टीत त्यांनी भाग घेऊ नये (नाक खूपसू नये).भारतीयांना माहित आहे भारत काय आहे आणि भारतासाठी काय चांगले- काय वाईट ते ते ठरवतील.चला, एक देश म्हणून एकजुटीने राहू या. #एकजूट भारत #भारतविरोधी प्रचार

सचिनने हे विचार सामान्य परिस्थितीत मांडले असते तर त्याचे स्वागतच आहे. कोणत्याही देशाभिमानी व्यक्तीला पटावेत असेच हे विचार आहेत परंतु ज्या पार्श्वभूमीवर सचिनने हे विचार व्यक्त केले आहेत त्यामुळेच सारा गहजब झाला आहे आणि कुणी मानो अथवा न मानो, सचिनने बऱ्याच लोकांची नाराजी ओढवून घेतली आहे.

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Farmers Protest) आंतरराष्ट्रीय पाॕपस्टार गायिका रिहान्ना (Rihanna) , पर्यावरणवादी ग्रेटा थुनबर्ग (Greta Thunberg) यांच्यासह काही इंटरनॅशनल सेलिब्रेटींनी पाठिंबा व्यक्त केल्यावर सचिनचे हे ट्विट आले आहे त्यामुळे ते शेतकरी आंदोलनासंदर्भातच हे गृहीत धरुन वादळ सुरु झाले आहे.

सचिनने शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाजूने बोलावे की विरोधात हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तो एक सेलिब्रेटी असल्याने त्याच्या या मतावर गहजब झाला आहे. आपले मत मांडायचा सचिनला हक्क असला आणि देशापुरता विचार करता त्याचे समर्थनच करायला हवे असे असले तरी परक्या व्यक्तींनी भारताच्या अंतर्गत गोष्टींबद्दल जेंव्हा बोलू नये असे जेंव्हा तो म्हणतो तेंव्हा हेच तत्व भारतालाही लागू आहे हे तो विसरला असे दिसते. भारताने गेल्या काही दिवसात किती परक्या देशांतील गोष्टींबद्दल भाष्य केले आहे आणि भारताचा आंतरराष्ट्रीय पातळीवर परक्या देशांच्या अंतर्गत प्रश्नांबाबत काय इतिहास राहिला आहे याचा त्याने अभ्यास करायला हवा होता. अमेरिकेत कॕपिटालमध्ये झालेल्या गोंधळावेळी तिरंगा दिसल्याचे उदाहरण ताजे आहे.

वस्तुस्थिती तर अशी आहे की भारत सरकार गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय पातळीवर जवळपास सर्वच विषयांवर बोलले, पण शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल बोलायलाच त्यांना वेळ नाही अशी टीकासुध्दा समाजमाध्यमातून झाली.

रिहान्नानेसुध्दा तेच म्हटलेय की ते या विषयावर बोलत का नाही..तिने हे करा की ते करा असा सल्ला दिलेला नाही.

शेतकऱ्यांसाठी आपण एका काॕलवर उपलब्ध आहोत असे म्हणणारे पंतप्रधान खरोखरच शेतकऱ्यांशी बोलण्यास उत्सुक आहेत का हे रिहान्ना व ग्रेटापेक्षा आपण भारतियांना चांगले माहित आहे. त्यामुळे फलंदाजीच्या सराव करण्यात कुचराई न करणाऱ्या मास्टर ब्लास्टरने हे भाष्य करताना होमवर्क केलेला नाही हेच समोर आलेले आहे.

सचिन निसंशय महान खेळाडू आहे. त्याने देशाचा गौरव वाढवला आहे याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. त्याने काय मत मांडावे याबद्दल प्रश्न नाही पण ते मांडतांना अभ्यास केला असता तर आज सचिनबद्दल जी काही चर्चा झाली आहे ती झाली नसती. हे डॕमेज कंट्रोल होणे अवघड आहे.

अलीकडेच ग्रेट सुनील गावसकर यांनीसुध्दा असेच एक वादग्रस्त विधान (अनुष्का शर्मा) केले होते पण त्यांनी नंतर व्यवस्थित डॕमेज कंट्रोल करुन घेतले. मास्टर ब्लास्टरला ते जमेल की नाही…याबद्दल शंकाच आहे कारण सचिन असो की सनी असो, दोघांनीही संघाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी आपआपल्या काळात क्वचितच घेतल्याचा इतिहास आहे. संघाला सांभाळत बसण्यापेक्षा आणि त्याच्या यश अपयशाचा हिशेब देत बसण्यापेक्षा आपली बॕट भली आणि आपण भले अशी त्यांची भूमिका राहिल्याचा इतिहास आहे. त्यामुळे त्यांनी आता देशाबद्दल बोलावे हे चांगले व स्वागतार्ह जरी असले तरी विरोधाभासी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER