पवारांना समजायला १०० वर्षे लागतील, राऊतांच्या विधानामुळे सस्पेन्स वाढला

sanjay-raut-sharad-pawar

नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेचा सस्पेन्स शरद पवारांच्या कालच्या पत्रकार परिषदेनंतर अधिकच वाढला आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीत महाशिवआघाडीबाबतचा अंतिम निर्णय होणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातवर्तवल्या गेली होती. मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत शिवसेना आणि सत्तास्थापना या कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही असं पवारांनी स्पष्ट केलं. मात्र, सरकार स्थापनेबाबत खासदार संजय राऊत अद्यापही प्रचंड आशावादी आहेत. हळू हळू सगळं उलगडेल, लवकरच महाराष्ट्रात सरकार बनले, असे राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलंय.

महाराष्ट्रात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वात सरकार बनणार असून ते स्थिर राहिल, असा विश्वास संजय राऊत यांनी बोलून दाखवला. राऊत यांनी दिल्लीत सकाळीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना, शरद पवार काहीच चुकीचं बोलत नसल्याचे राऊत यांनी म्हटले. शिवसेना मोठा पक्ष आहे, म्हणून सरकार स्थापनेविषयी शिवसेनेला जाऊन विचारा, हे म्हणणे चुकीचं नसल्याचं म्हणत शरद पवारांना समजायला १०० वर्षे जन्म घ्यावे लागतील, असं राऊत यांनी म्हटले.

भाजप प‍ळून गेल्याने राष्ट्रपती राजवट : संजय राऊत

तसेच, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही गंभीर असून राज्यातील सर्वच खासदारांनी याप्रश्नी एकत्र यावे. मोदींनी पवारांचं कौतुक केलं म्हणून काय झालं. पवार माझे गुरु असल्याचं मोदींना जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे, त्याचा राजकीय अन्वयार्थ निघत नाही. शिवसेनेच्या मनात कुठलाही गोंधळ नसून मीडियाच्याच मनात गोंधळ निर्माण झाला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीची पत्रकारांनी चिंता करून नये. योग्यवेळी सरकार स्थापन होईल. तसेच विधानसभेत १७० सदस्यांचा पाठिंबा आम्ही दाखवू, असा दावाही संजय राऊत यांनी केला.

‘’महाराष्ट्राचा विचार केल्यास येथे भाजपाला शिवसेने उभे केले, जागा दिली. शिवसेना ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वात जुन्या सदस्यांपैकी एक होती. मात्र आता भाजपाने शिवसेनेच्या संसदेतील खासदारांची आसनव्यवस्था बदलली आहे. भाजपाने युती तोडून आपला जुना आणि सर्वात मोठा मित्र पक्ष गमावला आहे. याची किंमत भाजपाला भविष्यात मोजावी लागेल,’’असे संजय राऊत म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासोबत युती करण्याची शिवसेनेची इच्छा नव्हती. मात्र अमित शाह मातोश्रीवर आले आणि युतीबाबत बोलणी केली. असेही राऊत म्हणाले.

रामदास आठवलेंनी भाजपला ३ वर्ष आणि शिवसेनेला २ वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याचा एक नवा फॉर्म्युला सांगितला. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी रामदास आठवलेचं हेच ऐकायचं बाकी होतं असं म्हणत त्यांच्यावर मिश्किल टीका केली. ते म्हणाले, “रामदास आठवलेंकडून हेच ऐकायचं बाकी होतं. रामदास आठवले केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यांनी केंद्रातील आपले अधिकार वाढवण्यासाठी प्रयत्न करावे. शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी कुणाच्या मध्यस्थीची गरज नाही.” शिवसेनेच्या नेतृत्वात राज्यात स्थिर सरकार स्थापन होईल असा दावाही त्यांनी केला.