राज्यात काही ठिकाणी पाच – सहा दिवस वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊस

Rain

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी पाऊस (Rain) सुरू आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी पाऊस झाला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. पुढील पाच ते सहा दिवस राज्यातील अनेक भागात वादळी वारे, विजांसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

काही दिवसांनंतर पाऊस परतला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. सोबत आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीजवळ चक्री वाऱ्यांमुळे राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होते आहे. ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहणार असून विदर्भासह राज्यातील काही भागात पावसाने जोर धरला आहे.

सध्या राज्यातील काही भागात सकाळपासून ऊन पडले आहे. उकाड्यात वाढ होत असून कमाल तापमानात वाढते आहे. मध्यरात्रीनंतर हवेत काहीसा गारवा निर्माण होतो आहे. सकाळी काहीसे धुके पडते.

सोलापूर येथे ३४.७ अंश सेल्सिअस सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. पुण्यातही कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली असून सरासरीच्या तुलनेत १.३ अंश सेल्सिअसने जास्त आहे. पुण्यात ३२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. महाबळेश्वर येथे १६.० अंश सेल्सिअस सर्वांत कमी किमान तापमान नोंदले आहे.

मुसळधारचा अंदाज

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली,कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER