हार्दिक पाजणार थंडाई

Hardik Joshi

तीन वर्ष ज्या .मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली . . राणादा हे नाव घराघरात पोहोचवलं ती ” तुझ्यात जीव रंगला” ही मालिका खरेतर संपली आहे. तरीही आता हार्दिक जोशी चर्चेत का आहे ? त्याचा कुठला नवा सिनेमा येतोय का ? की नव्या मालिकेत हार्दिक जोशीचा चेहरा झळकणार आहे ? की खरोखरच राणादा म्हणून कुस्तीचे डावपेच यशस्वी करणारा हार्दिक प्रत्यक्ष आयुष्यात तर कुणाला आसमान दाखवायला तयार झालेला नाही ना ? असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात आले आहेत. पण राणादा म्हणजेच हार्दिक जोशी चर्चेत आला आहे तो त्याच्या नव्या फूड ब्रँड मुळे.

चालतंय की हा डायलॉग फेमस करणारा अभिनेता हार्दिक जोशीने कोल्हापूर बदाम थंडाई हे खास देशी कोल्ड्रिंग घेऊन फूड इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले आहे. नुकतेच त्याने त्याच्या सोशल मीडिया पेजवर याबाबत एक पोस्ट शेयर केली आहे. त्यासोबत त्याने लिहिले आहे की येणार नव्हं … यायला लागतंय की . राणाचा हा डायलॉग मालिकेत तर फेमस झालाच होता पण आता याच खास शैलीत त्याने त्याच्या चाहत्यांना आणि खवय्यांना सुद्धा हाक दिली आहे. राणाची ही कोल्हापूर बदाम थंडाई अर्थातच कोल्हापुरातल्या खाऊ गल्लीमध्ये खवय्यांना मिळणार आहे.

आजकाल प्रत्येक कलाकार अभिनयासोबत एक वेगळा व्यवसाय देखील यशस्वीपणे करत आहे. त्यापैकी कुणाचा साडीचा ब्रॅण्ड आहे तर कोणी हॉटेलचेनमध्ये उतरला आहे. हार्दिक जोशीनेही त्याच्या आवडत्या फूड इंडस्ट्री मध्ये पाऊल टाकत कोल्हापूर बदाम थंडाई हे नवे दालन सुरू केलं आहे.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या निमित्ताने हार्दिक तीन वर्ष कोल्हापुरातल्या वसगडे या गावात होता. त्यानंतर काही दिवस तो केर्ली या गावामध्ये होता. या मालिकेचं शूटिंग वसगडे आणि केर्ली या दोन गावांमध्ये झालं. तीन वर्ष कोल्हापुरात शूटिंगच्या निमित्ताने राहिल्यामुळे त्याला कोल्हापूर काय आहे . कोल्हापूरच्या लोकांना नेमकं काय आवडतं . हे सगळं जाणून घेण्याची संधी मिळाली. जेव्हा तुझ्यात जीव रंगला ही मालिका संपली तेव्हा त्याने असा विचार केला की आपल्याला फूड इंडस्ट्रीमध्ये काही करायचं असेल तर त्याची सुरुवात कोल्हापुरातून करावी.

हार्दिक सांगतो, एक तर मी पैलवानची भूमिका करत असल्यामुळे या निमित्ताने अनेक पैलवानांची गाठभेट झाली होती. शिवाय कोल्हापुरात पैलवानच नव्हे तर कोल्हापूरकरांनादेखील थंडाई बद्दल आकर्षण आहे. कोल्हापुरात फक्त होळीच्या निमित्ताने थंडाई प्यायली जात नाही तर बारा महिने थंडाईवर ताव मारला जातो . शिवाय कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांनाही कोल्हापूरच्या थंडाईचं आकर्षण आहे. या सगळ्याचा विचार करून मी व्यवसाय करायचा हे ठरवलं तेव्हा मी कोल्हापूरची निवड केली. कुस्तीचं मैदान म्हणजे खासबाग मैदानाच्या परिसरातच कोल्हापुरातली प्रसिद्ध अशी खाऊगल्ली आहे जिथे सगळ्या प्रकारचे पदार्थ एकाच ठिकाणी मिळतात. त्या खाऊगल्लीत कोल्हापूर बदाम थंडाईचं दालन सुरु केलं. कोल्हापूरमध्ये विशिष्ट पद्धतीने थंडाई बनवली जाते. अत्यंत पौष्टिक असलेल्या या थंडाईमध्ये बदाम, दूध, जायफळ असतं. मनाला आणि शरीराला शांतता देणारं हे पेय आहे. तुझ्यात जीव रंगला ही मालिका करत असताना मला मला पडद्यावर पैलवानचा लूक कायम ठेवायचा होता. त्यावेळेला मी रोज न चुकता व्यायाम करायचो. त्यानंतर मी थंडाई प्यायचो. त्या दरम्यान मला थंडाईचं पौष्टीकदृष्टीने महत्त्व आहे ते कळालं म्हणूनच मी थंडाई बिजनेस करायचे ठरवले आहे.

हार्दिकने तुझ्यात जीव रंगला या मालिकेत काम करण्यापूर्वी अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम केलं आहे. पण तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादा म्हणजेच रणविजय गायकवाड या व्यक्तिरेखेने त्याला घराघरापर्यंत पोचवले. इतकेच नव्हे तर प्रचंड प्रसिद्धी त्याला या भूमिकेने मिळाली. हार्दिकला भेटण्यासाठी अनेक ठिकाणाहून त्याचे चाहते कोल्हापूर जिल्ह्यातल्या वसगडे गावी जिथे या मालिकेत शूटिंग होतं तिथे त्याला भेटायला जात होते. राणादा हे नाव खऱ्या आयुष्यातही त्याच्या इतक्या जवळ झालं की लोक त्याला राणादा या नावानेच बोलवायचे. कोल्हापुरात या निमित्ताने हार्दिकची मित्रमंडळी झालेली आहेत आणि मालिका संपल्यानंतर तो त्याच्या मुंबईच्या घरी गेला असला तरी त्या कोल्हापुरातल्या मित्रमंडळीशी त्याचा नेहमी संपर्क आहे. जेव्हा त्याने बिझनेस करायचा हे त्याच्या कोल्हापुरातल्या मित्रांना सांगितलं तेव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि कोल्हापुरातलं त्याच्या थंडाईचं दुकान सुरु करण्यासाठी त्याच्या कोल्हापुरातल्या मित्रमंडळींनी त्याला खूप सहकार्य केलं.

रंगा पतंगा या सिनेमातून हार्दिक जोशीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. छोट्या-मोठ्या भूमिका करत त्याने अभिनय प्रवास सुरू ठेवला. इतकच नव्हे तर अनेक प्रोजेक्टमध्ये त्याने पडद्यामागे देखील सहकार्य केलं. तुझ्यात जीव रंगला ही मालिका संपल्यानंतर सध्यातरी आता त्याच्याकडे अभिनायासाठी कुठलाही नवीन प्रोजेक्ट आलेला नाही. पण आता थंडाईच्या निमित्ताने तो त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचणार आहे. सोशल मीडियापेज वर त्याने थंडाई बद्दल सगळी माहिती दिलेली आहे. एकूणच एका मालिकेच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेला हार्दिक जोशी थंडाईच्या निमित्ताने कोल्हापूरशी नाळ जोडून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER