
मुंबई : परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) गंभीर आरोप केले आहेत. यावरून काँग्रेस (Congress) नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर (BJP) सडकून टीका केली आहे.
साम-दाम-दंड-भेद या सगळ्यांचा वापर करून सरकारं पाडायची, हाच भाजपचा उद्योग आहे, असे म्हणत सचिन सावंतांनी भाजपवर निशाणा साधला. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
पोलीस दलातील अधिकाऱ्याने पत्र लिहून खदखद व्यक्त केल्याची घटना देशात पहिल्यांदा घडलेली नाही. २००२ मध्ये डी. जी. वंजारा गुजरात पोलीस दलाचे प्रमुख होते. गृहमंत्री अमित शहा पोलीस दलाचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी शहांनी राजीनामा दिला होता का? असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.
वंजारा यांच्यासारखेच आरोप पोलीस अधिकारी संजीव भट यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींवर केले होते. त्यावेळी मोदींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता का? असे म्हणत सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांना फटकारले आहे.
दरम्यान, भाजपचे षडयंत्र स्क्रिप्टेड असते. पोलीस आयुक्तपदावरून दूर झालेले परमबीर सिंग पत्र लिहिणार याची भाजप नेत्यांना कल्पना होती. त्यांना सगळं आधीपासूनच माहीत होतं. त्यामुळेच तर पत्र बाहेर येताच फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली, असे सचिन सावंत यांनी सांगितले आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला