“बीडमध्ये उमेदवार जाहीर करणे ही माझी चूक झाली” – शरद पवार

sharad pawar

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली असल्याने ती रोखण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार हे खुद्द मैदानात उतरले आहेत. ते सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, आज ते नांदेडमध्ये दाखल झाले. यावेळी प्रसारमाध्यमांशी चर्चा करतांना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. महापुरादरम्यान राज्यकर्त्यांनी कोल्हापूर- सांगलीत लोकांमध्ये मिसळून त्यांना विश्वास द्यायला हवा होता, पण ते घडलं नाही. सत्ताधारी नेत्यांबाबत लोकांमध्ये नाराजी आहे, असं पवार म्हणाले.

ही बातमी पण वाचा : पवार देत आहेत तरुणांना संधी; पण घराणेशाही अबाधित

“बीडमध्ये उमेदवार जाहीर करणं ही माझी चूक झाली. प्रदेशाध्यक्षाने उमेदवार जाहीर करायला हवे होते. पण लोकाग्रहास्तव मी उमेदवार जाहीर केले”, अशी खंतही पवार यांनी बोलून दाखवली. आता जे देशात घडतंय ते योग्य नाही. सीबीआय, ईडी अशा सरकारी यंत्रणा या गुन्हेगारांसाठी होत्या, मात्र सत्तेचा गैरवापर करत पक्षांतर घडवल्या जातोय, याबद्दल लोकांमध्ये राग आहे. गेली पाच वर्षे देशात कुणाचं राज्य होतं? उदयनराजे यांची कामे कुणी रोखली? विरोधीपक्षात राहूनही लोकांची कामे करता येतात. असं म्हणत त्यांनी उदयनराजेंच्या आरोपांना उत्तर दिलं.

बारामती जिल्हा करण्यास माझा कधीच पाठिंबा नव्हता. मी आता निवडणुकीला उभे राहणार नाही, आता नेतृत्व तयार करण्याचं माझं काम आहे. मात्र राज्यकर्ते माझ्यावर टीका करतात, याचा अर्थ आमचं बर चाललंय. काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, तर काही लोकांना घाबरवत पक्षांतर करायला भाग पाडले, असा आरोप त्यांनी केला.

ही बातमी पण वाचा : राष्ट्रवादीतील संघर्षामुळे इंदापूरच्या गुंता कायम