बॉलिवू़डमधील चित्रपटांना संगीत देण्याची सुरुवात केली होती एका महिलेनेच

womens music directo

भारतीय चित्रपटसृष्टीत संगीताचे फार मोठे आणि महत्वाचे स्थान आहे. प्रत्येक चित्रपटात प्रसंग कोणताही असो गाणी असतातच. त्यामुळेच देशभरात हजारो गायक, गीतकार, संगीतकार आढळून येतात. अनेक वाहिन्यांवर गायकांचा शोध घेणारे रियालिटी शो सादर करून आणखी नवे गायक तयार केले जातात. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक संगीतकार झाले परंतु भारतात चित्रपटाला संगीत देण्याची सुरुवात एका महिलेने केली होती हे फार कमी जणांना ठाऊक आहे. ज्या काळात चित्रपटात महिलांना काम करणे कमीपणाचे मानले जात होते त्या काळात संगीत देण्याचे काम महिलेने केले खरे परंतु नंतर हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याही महिला संगीतकार झाल्या नाहीत हे दुर्देवच.

देशात पहिला बोलता चित्रपट प्रदर्शित झाला होता ‘आलमआरा’. 14 मार्च, 1931 ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटापासून देशात चित्रपटातील गीत-संगीताला सुरुवात झाली होती. या चित्रपटाला फिरोजशाह मिस्त्री आणि बेहराम ईरानी यांनी संगीत दिले होते. यातील दे दे खुदा के नाम पर हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्यानंतर चित्रपटात गीत-संगीताला सुरुवात झाली.

देशातील पहिली महिला संगीतकार म्हणून नाव मिळवले आहे ते इशरत सुलताना यांनी. त्यांना बिब्बो म्हणूनी ओळखले जात असे. त्यांनी 1934 मध्ये प्रदर्शित झालेल्या अदल-ए-जहांगीर चित्रपटाला संगीत दिले होते. त्यानंतर 1937 मध्ये प्रदर्शित झालेल्या कझाक की लड़की चित्रपटालाही संगीत दिले होते. इशरत सुलताना गायिकाही होती. तिने 30 आणि 40 च्या दशकात देविका राणी, दुर्गा खोटे यांच्यासाठी गाणीही गायली होती. फाळणीनंतर त्या पाकिस्तानला गेल्या.

यानंतर नर्गिसची आई जद्दनबाई यांनी चित्रपटाला संगीत देण्यास सुरुवात केली. 1935 मध्ये आलेल्या तलाशे-हक ला संगीत देऊन त्यांनी आपली कारकिर्द सुरु केली. या चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिकाही साकारली होती. यानंतर 1936 मध्ये आलेल्या मॅडम फॅशनला संगीत देण्यासोबतच त्याचे दिग्दर्शनही केले होते.

मात्र या महिला संगीतकारांनी दोन-चार चित्रपटांनाच संगीत दिले होते. खरे नाव मिळवले ते सरस्वती देवी यांनी. त्यांनी जवळ-जवळ दहा वर्षे संगीतकार म्हणून चित्रपटसृष्टीत काम केले. 1935 मध्ये आलेल्या जवानी की हवा चित्रपटाने त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून आपली कारकिर्द सुरु केली. या चित्रपटात त्यांनी अशोक कुमारकडून ‘कोई हमदम न रहा, कोई सहारा न रहा’ गीत गाऊन घेतले होते. काही वर्षानंतर किशोर कुमारने हेच गाणे आपल्या ‘झुमरू’ चित्रपटात वापरले होते. सरस्वती देवींना खरी ओळख मिळाली ती 1936 मध्ये आलेल्या देविका राणी अभिनीत बॉम्बे टॉकिजच्या ‘अछूत कन्या’ने. ‘मैं बन की चिड़िया बन के बन में बोलूं रे’ हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते आणि आजही ऐकले जाते. सरस्वती देवी यांचे खरे नाव खुर्शिद मिनोचर होमजी. फार कमी जणांना ठाऊक आहे की त्यांच्या कोरसमध्ये किशोर कुमार आणि मदन मोहनही गात असत.

सरस्वती देवी यांनी 1940 मध्ये आलेल्या ‘बंधन’ चित्रपटात ‘चना जोर गरम बाबू मैं लाया मजेदार’ गीत तयार केले होते. हेच गाणे नंतर मनोज कुमारने 1981 मध्ये आपल्या क्रांती चित्रपटात वापरले आणि त्याला आवाज दिला होता किशोर कुमारने. सरस्वती देवी यांनी बॉम्बे टॉकीजच्या ‘इज्ज़त’,‘जीवन प्रभात’, ‘वचन’, ‘कंगन’, ‘झूला’ इत्यादी चित्रपटांना संगीत दिले होते. त्यानंतर त्यांनी सोहराब मोदी यांच्या ‘भक्त रोहिदास’, ‘पृथ्वीवल्लभ’, ‘डॉ कुमार’ साठी संगीत दिले. त्यानंतर त्यांनी 1945 मध्ये ‘आम्रपाली’ चित्रपटाला संगीत दिले जे प्रचंड लोकप्रिय झाले. सरस्वती देवी यांनी 1949 मध्ये आलेल्या ‘उषाहरण’ चित्रपटात लता मंगेशकर यांच्याकडूनही गाणे गाऊन घेतले होते.

त्यानंतर चित्रपटसृष्टीत उषा खन्ना यांनी महिला संगीतकार म्हणून चांगलेच नाव कमवले होते. त्यांची अनेक गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. ऊषा खन्ना यांनी 1940 मध्ये आशा पारेख अभिनीत ‘दिल देके देखो’ चित्रपटाद्वारे संगीत दिग्दर्शिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. जवळ जवळ 40 वर्ष त्यांनी संगीतकार म्हणून काम केले आणि किशोर, रफी, मुकेश अशा मोठ्या गायकांकडून गाणी गाऊन घेतली. त्यांची ‘शायद मेरे शादी का खयाल’, ‘जिंदगी प्यार का गीत है’ अशी अनेक अवीट गोडीची गाणी दिली.

लता मंगेशकर यांनीही ‘आनंद घन’ नावाने काही हिंदी आणि मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. लता मंगेशकर यांनी 1955 मध्ये पहिल्यांदा ‘राम राम पाव्हणं’ चित्रपटाला संगीत देऊन संगीतकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘साधी माणसं’, ‘तांबडी माती’ चित्रपटांना संगीत दिले. साधी माणसंसाठी राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. त्यानंतर आताच्या काळात काही महिला संगीतकार उदयास आल्या आहेत पण त्यांचे संगीत म्हणावे तसे लोकप्रिय झालेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER