
मुंबई : भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी आज मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला कुठलाही शब्द दिलानसल्याचा खुलासा केला. त्यानंतर शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी अमित शहांची खिल्ली उडवली. शिवसेनेला कोणतंही वचन दिलं नव्हतं. असं अमित शहा सांगत आहेत. त्यांना हे सांगायला सव्वा वर्ष लागलंय. यातच कळतंय पाणी किती मुरलंय, असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे.
अरविंद सावंत (Arvind Sawant) म्हणाले की, वचन दिलं होतं की नाही, हे सांगायला शहा यांना सव्वा वर्ष लागलं. यातच कळतंय पाणी किती मुरलंय. ठाकरे कुटुंब नेहमीच खरे बोलतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप-शिवसेनेची जी पत्रकार परिषद झाली होती. त्यात 50-50चा फॉर्म्युला ठरला होता. अमित शहांनीच हा फॉर्म्युला घोषित केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीतच झालेली ही फसवणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहन झाली नाही, असं अरविंद सावंत यांनी सांगितलं. जेव्हा विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा वाद झाला तेव्हा शहा हरियाणाला का गेले? मुंबईत येऊन त्यावर चर्चा का केली नाही? असा उलट प्रश्नही त्यांनी केला.
बिहारमध्ये हातातून सत्ता जाईल हे त्यांना माहीत होतं. शिवाय बिहारमध्ये त्यांना पाठिंबा द्यायला दुसरा कोणताही पक्ष नव्हता. त्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली आणि नितीशकुमारांना पाठिंबा द्यावा लागला. भाजप हा सर्वात मोठा पक्ष असला तरी सर्व राज्यात फोडाफोडीचं राजकारण करत आहे. सत्तेसाठी ते काहीही करतात. मात्र राज्यात त्यांचं मिशन कमळ यशस्वी होणार नाही. ठाकरे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असंही ते म्हणाले. भाजप नेते नारायण राणे यांच्या कार्यक्रमाला कुठून कुठून लोकं आले होते, याची जरा माहिती घ्या, असंही ते म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला