पुनर्बांधणी प्रकल्प रेंगाळल्यामुळे लोकांचे बेघर होणे चिंताजनक

Bombay High Court - Redevelopment Schemes - Maharashtra Today
  • हायकोर्टाची सूचना: विश्वासार्ह विकासकालाच काम द्यावे

मुंबई : सरकारी आणि महापालिकेच्या जागांवरील इमारती व झोपडपट्ट्यांचे पुनर्बांधणी प्रकल्प (Redevelopment Schemes) रेंगाळल्याने तेथील मोठ्या संख्येने असलेल्या रहिवाशांना कित्येक वर्षे बेघर अवस्थेत राहावे लागणे ही ‘भयसूचक परिस्थिती’ आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने त्याविषयी चिंता व्यक्त केली.

महापालिकेच्या जागेवरील मुंबईतील अशाच एका रेंगाळलेल्या पुनर्बांधणी प्रकल्पाविषयी शकील मोहम्मद यांच्यासह तेथील ३७ रहिवाशांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने अशा रेंगाळलेल्या प्रकल्पांविषयी न्यायालयातही बऱ्याच याचिका येत असतात, असे नमूद केले. प्रस्तुत याचिका ज्या प्रकल्पासंबंधी आहे त्याचे पुनर्बांधणीचे काम गेल्या पाच वर्षांत जोत्याच्या वर गेलेले नाही, याचीही खंडपीठाने नोंद घेतली.

मुळात ज्या विकासकांची प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची कुवतच नाही अशा विकासकांना महापालिका किंवा सरकारी मालकीची जमीन विकसित करण्याचे हक्क देण्याचे धोरण कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित करून खंडपीठाने यासंदर्भात काही व्यापक मुद्देही मांडले. न्यायालयाने म्हटले की, गलिच्छ वस्त्यांमध्ये आणि मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहणार्‍या लोकांना चांगल्या घरात राहता यावे या कल्याणकारी हेतूने हा पुनर्बांधणीचा कायदा केलेला असल्याने सरकारचे धोरणही त्यास अनुरूप असेच असायला हवे.

पूर्वी अशी कामे वेळेवर व प्राणिकपणे पूर्ण केल्याचा ठोस अनुभव असलेल्या विकासकांचे पॅनल तयार करून त्यापैकी विकासकांना अशी कामे देण्याचा विचार सरकार करू शकेल, अशी सूचनाही खंडपीठाने केली. विकासकाच्या दिरंगाईमुळे नाडलेल्या प्रत्येकाला न्यायालयाकडे दाद मागणे शक्य नसते. त्यामुळे अशी प्रकरणे मुळात न्यायालयात येणारच नाहीत यासाठीही सरकारने या दृष्टीने विचार करणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने म्हटले.

वर केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने सरकार व महापालिकेस प्रतिज्ञापत्र करण्यास सांगून पुढील सुनावणी तीन आठवड्यांनी ठेवण्यात आली. पुढच्या वेळी अ‍ॅडव्होकेट जनरलनाही न्यायालयास मदत करण्यासाठी पाचारण करण्यात आले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER