मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा दुर्दैवी, अहंकारातून – फडणवीस यांची टीका

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा दुर्दैवी निर्णय केवळ अहंकारातून घेतला, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

मेट्रो कारशेड कांजूरमार्गला नेल्यास ४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते, आणि कशासाठी? असा प्रश्न फडणवीस यांनी विचारला आहे.

“कांजूरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारने विचार केला. पण, त्यावर उच्च न्यायालयाची स्थगिती होती. काही खाजगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला. स्थगिती मागे घ्या, म्हणून विनंती करण्यात आली, तर न्यायालयाचे दावे पुढील काळात निकाली निघाले, त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितली. ही रक्कम २०१५ मध्ये सुमारे २४०० कोटी रुपये होती. आज त्या प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे? प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले तर विलंबाला जबाबदार कोण? शिवाय, कांजूरमार्गची जागा ‘Marshy land‘ असल्याने त्याला स्थिर करण्यासाठी किमान २ वर्ष लागतील. याशिवाय आतापर्यंतच्या सर्व निविदा रद्द कराव्या लागतील आणि नव्याने संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागेल, असे फडणवीस म्हणाले.

नवीन जागेसाठी डीपीआर किंवा फिजीबिलीटी अहवाल काहीही तयार झालेले नाहीत. म्हणजे जो मेट्रो प्रकल्प पुढच्यावर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता, तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. आरेच्या कारशेडसाठी ४०० कोटी आधीच खर्च झालेले, स्थगितीमुळे १३०० कोटी पाण्यात गेले. शिवाय ४ हजार कोटींचा वाढीव भार. कांजूरमार्ग जागेचा वाद कायम राहिल्यास २४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार. आज त्यात आणखी किती वाढ होणार? असा सवाल फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खीळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते, असे फडणवीस यांनी विचारले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER