१ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण होणार नाही, हे दुर्दैव : सचिन सावंत

Sachin Sawant - Maharashtra Today
Sachin Sawant - Maharashtra Today

मुंबई :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आरोग्यव्यवस्था कोलमडून पडली आहे. बऱ्याच कोरोना रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. यासाठी वेगाने लसीकरण होणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण करायचे कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

१ मेपासून केंद्र सरकारने १८ ते ४४ वयोगटातील देशातील तरुणांना लसीकरणाची घोषणा केली. अत्यंत ढिसाळ आणि नियोजनशून्य मोदी सरकारने लसींचा पुरवठा न केल्याने हा कार्यक्रम देशपातळीवर सुरू होणार नाही, हे दुर्दैव आहे. शिवराजसिंह चौहान यांनीही मध्यप्रदेशात लसींअभावी १ मे रोजी लसीकरण सुरू होणार नाही, असे स्पष्ट केले. लसींचा साठा उपलब्ध नसल्याने मोदी सरकार जबाबदार आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) आणि भाजप आयटी सेलसारखे नेते राज्य सरकारवर दोषारोप करत आहेत. याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात.

देशातील युवावर्गाची जबाबदारी मोदी सरकारने राज्यांवर दिली. पण, आता लसीकरणातील दिरंगाई ही तरुणाईच्या जीवावर उठणारी आहे. ही दिरंगाई केवळ १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नाही. केंद्राकडून लसींचा पुरेसा पुरवठा न झाल्याने ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील लसीकरणातही अडचणी येत आहेत. महाराष्ट्राला जाहीर केलेल्या ४ लाख ३५ हजार रेमडेसिवीरपैकी केवळ २ लाख ३० हजार इंजेक्शन्स पाठवले आहेत. मोदी सरकार दिलेले शब्द पाळत नसेल, तर राज्यांनी नियोजन कसे करावे? असा प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button