राज्याचे अधिकार काढून देशात हळूहळू आणीबाणी लादण्याचा केंद्राचा प्रयत्न – सुप्रिया सुळे

Supriya Sule

मुंबई :- अनलॉक सुरू झाल्यापासून राज्यातील मंदिरे उघडा अशी मागणी भाजप (BJP) नेते करत आहेत. मंदिरे उघडण्यासाठी भाजप आक्रमक भाषेचाही वापर करत आहेत. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मंदिराच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. या राज्यात मंदिराचे टाळे तोडण्याची भाषा कधीच ऐकली नव्हती. आज अशी भाषा वापरली जाते हे दुर्दैव आहे. सत्ता नसल्यामुळे कदाचित त्यांना काहीच सुचत नसेल. त्यामुळे ते बिचारे असे वागत असतील. त्यांचा तोल ढळला असावा, अशी बोचरी आणि खोचक टीकाही त्यांनी केली.

तसेच, मेट्रो कारशेडच्या जागेवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. या वादात आता राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनीही उडी घेतली आहे. सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.मिठागराची ती जागा राज्य सरकारचीच आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे एखाद्या राज्यातील जमिनीवर पहिला अधिकार हा त्या राज्याचाच असतो, असे  सांगतानाच केंद्र सरकार सातत्याने राज्याचे अधिकार काढून देशात हळूहळू आणीबाणी आणत आहे, असा घणाघाती आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सरकारने मिठागराच्या जागेवर दावा केला आहे. ही त्यांचीच जमीन असल्याची धक्कादायक गोष्ट त्यांच्याकडूनच कळली. खरं तर ती जमीन महाराष्ट्राचीच आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे एखाद्या राज्यातील जमिनीवर त्या राज्याचा पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम करत आहे. त्यांच्या कृतीतूनच हे दिसत असून ही दुर्दैवी  घटना आहे.

कांजूरमार्गमधील मिठागराची जमीन महाराष्ट्राची आहे. विकासकामासाठी तिचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजप कोणत्या आधारावर टीका करत आहे, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे. तसेच, केंद्र सरकार या देशात हळूहळू आणीबाणी आणू पाहात आहे. सध्या तरी तसंच चित्रं दिसतंय, असंही त्या म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER