गदिमांचे `लळा जिव्हाळा शब्दच खोटे…’ हेच खरे

ग दि माडगूळकर

Shailendra Paranjapeग दि माडगूळकर (Gajanan Digambar Madgulkar) हे नाव उच्चारलं की गीत रामायण पटकन आठवतं. माडगूळकर खऱ्या अर्थानं सरस्वतीपुत्र होते. गदिमांचे पद्यलेखन, गीतलेखन याइतकेच गद्यलेखनही दर्जेदार आहे पण त्याची फारशी चर्चा केली जात नाही.

गदिमांनी केलेला अभिनय, हाही स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल. वऱ्हाडी वाजंत्री किंवा पेडगावचे शहाणे अशा चित्रपटात चेहरा निरागस ठेवत त्यांनी साकार केलेल्या व्यक्तिरेखा, त्यांच्या व्यथा हे इतकं प्रभावीपणे पोचवलंय की नुसते चरित्र अभिनेते म्हणूनही ते कारकीर्द करू शकले असते, असा विचार मनात येतो.

गदिमा, सुधीर फडके आणि राजा परांजपे या त्रिमूर्तीनं उत्तमोत्तम मराठी चित्रपट दिले. त्यांच्या कामगिरीवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम मंतरलेल्या चैत्रबनात १९७० च्या दशकात सादर होत असे आणि या कार्यक्रमातून निवेदक सुधीर गाडगीळ, रंजना पेठे-जोगळेकर, शैला दातार, अनुराधा मराठे, प्रमोद रानडे, मुकुंद फणसळकर, रमाकांत परांजपे, पांडुरंग मुखडे, अजय धोंगडे, सचिन जांभेकर या गायक-गायिका, वादकांची करिअर्स घडली.

गदिमांच्या गाण्यांचे, आठवणींचे अनेक किस्से आहेत. त्यांच्या प्रतिभेवर महाराष्ट्राच्या तीन पिढ्याचं भरणपोषण झालं आहे. असं असूनही गदिमांचं स्मारक पुण्यात नाही, हे सांगितल्यावर विश्वास बसत नाही. गदिमा हे गीतकार की कवी, यावर पुण्यात वाद परिसंवाद झडले आहेत. तज्ज्ञांनी चिकित्सक मंडळींनी त्याचा उहापोह करावा. सैद्धान्तिक मांडणी वगैरेही करावी पण गदिमांनी लाखो लोकांना आनंद दिला, त्यांच्या कलाकृतींमधून अनेकांना जगण्याची उमेद मिळाली, अनेकांनी संकटांवर मात केली ती गदिमांच्या शब्दातून पुन्हा उभारी घेऊन.

गदिमांच्या मृत्यूनंतर ४२ वर्षे उलटली तरीही त्यांचे उचित स्मारक पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीच्या शहरात, शिक्षणाच्या माहेरघरात नसावं, हे शल्य बोचल्यानं पुण्यात १४ डिसेंबरला एक अभिनव आंदोलन केलं जाणार आहे. आंदोलकांचे समन्वयक गझलकार प्रदीप निफाडकर यांच्यासह आनंद माडगूळकर, शीतल माडगूळकर, रवी परांजपे, पंडित विद्यासागर, नागनाथ कोत्तापल्ले, सदानंद मोरे, स्पृहा जोशी असे अनेक कलावंत, साहित्यिक, कवी, गझलकार १४ डिसेंबरला दिवसभर गदिमांच्या गीतांचे कवितांचे जाहीर वाचन करत बसणार आहेत तेही शहराच्या मध्यवर्ती लोकमान्य टिळक चौकात. सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे अभिनव आंदोलन होणार असून त्यात कोणत्याही राजकीय पक्षाला स्थान असणार नाही, हे निफाडकर यांनी स्पष्ट केले आहे.

मुळात शब्दप्रभू गदिमांच्या स्मारकासाठी आंदोलन करावं लागावं, ही पुण्याचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आणि मराठी भाषकांची शोकांतिका आहे. ही वेळ का यावी… लळा जिव्हाळा शब्दच खोटे…असं अजरामर गीत लिहून जगण्यातला व्यवहार अधोरेखित करणारे गदिमा गीतकार की कवी हा वाद रंगला आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या स्मारकासाठी आंदोलनाची वेळ यावी, ही गोष्ट आपणा सर्वांसाठी शरमेचीच आहे.

आपलं सारं शब्दरत्नभांडार मराठी साहित्य कलाविश्वावर, रसिकांवर उधळणाऱ्या माडगूळकरांचं यथोचित स्मारक दिमाखात उभं राहिलंच पाहिजे. तेही पुण्याच्या मध्यवर्ती भागात, तरच गदिमांच्या कार्यकर्तृत्वाला मानवंदना दिल्यासारखं होईल. या स्मारकातून मराठीची पताका पुन्हा एकदा साता समुद्रापार पोहोचावी. ज्ञानोबा-तुकोबाचा अंश माझ्यात आहे, हे गदिमांनी सांगितले होतेच पण तो आपल्यातही आहे, हे सिद्ध करायला हवे. स्मारक व्हायलाच हवे. आंदोलनाविना…

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :- ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER