‘घरात बसून कोणत्याही महत्त्वाकांक्षा व्यक्त करणे योग्य नाही’ : जयंत पाटील

मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) १० जूनला २२ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमाशी संवाद साधला. २०२४ पर्यंत राष्ट्रवादी पक्ष अधिक भक्कम होईल आणि जास्त लोक निवडून येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

२२ वर्षांचा कार्यकाळ हा चढउतारांचा होता. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांची (Sharad Pawar) नेहमीच महत्त्वाची भुमिका होती. शरद पवारांचे जुने सहकारी त्यांच्या भागात प्रभावी होते, म्हणून त्यांना प्रस्थापित म्हटले गेले, मात्र त्यातूनच आर. आर. पाटील यांच्यासारखे नेते पुढे आले, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

राष्ट्रवादी पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अधिक भक्कम होईल आणि यात जास्त लोक निवडून येतील, असे पाटील म्हणाले. त्यांना मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले की, “कोणत्याही राजकीय पक्षाला मुख्यमंत्रिपदासारखे सर्वोच्च पदाची आस्था असणे साहजिक आहे.” २०२४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा अशी तुमच्या पक्षाची महत्त्वाकांक्षा नाही का? असा प्रश्न विचारण्यात आला असताना ते म्हणाले की, “घरात बसून कोणत्याही महत्त्वाकांक्षा व्यक्त करणे योग्य नाही. जनतेने साथ दिली तर त्या त्या वेळी योग्य निर्णय शरद पवार घेतील. महाराष्ट्रातील नागरिकांना जे प्रश्न भेडसावत आहेत, ते सोडवणे, लोकांचे जीवनमान सुधारणे हे आमच्या पक्षाचे ध्येय आहे.”

दुसरे नेतेही शरद पवारांच्या प्रेमात

दुसऱ्या पक्षातील नेते सुद्धा शरद पवारांच्या कार्यपद्धतीकडे आदराने बघतात. अनेक लोक या पक्षात येण्याची इच्छा बाळगतात. मात्र, कोरोनामुळे (Corona) अडचणी आल्या आहेत. कृषीमंत्री म्हणून काय-काय करू शकतो हे पवारसाहेबांनी दाखवून दिले. यूपीएतील इतर पक्ष काय विचार करतात, माहित नाही, असे पाटील यांनी नमूद केले.

पक्ष सोडून गेलेले परत येतील

भाजपाने अडचणी निर्माण केल्याने काहींनी राष्ट्रवादी सोडला तर काहींनी दबावापोटी पक्ष सोडला असेल. त्यांनी पुन्हा पक्षात यायला हरकत नाही. सोडून गेलेल्याविषयी आम्हाला आकस नाही. हळूहळू सर्वच नेते परत येतील, असा दावा करत ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या काँग्रेसमध्ये विलीनिकरणाच्या वावड्या २२ वर्षांपासून उठतात.

ही बातमी पण वाचा : भविष्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री? शरद पवार परिस्थितीनुसार निर्णय घेतील, जयंत पाटलांचे विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button