कोरोनाच्या प्रसारासाठी कोणत्याही समाजाला दोष देणे योग्य नाही; शरद पवारांची पंतप्रधान मोदींशी चर्चा

मुंबई :- निजामुद्दीन येथील मरकजच्या कार्यक्रमामुळे देशात कोरोनाचे रुग्ण वाढल्याची ओरड विरोधकांकडून केली जात आहे. त्याच्याप्रमाणे प्रसारमाध्यमातही एका समाजाला लक्ष्य केले जात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेल्या चर्चेदरम्यान आपले मत व्यक्त केले. कोरोनाचे  गांभीर्य पाहता बहुतांशी लोकांनी सहकार्य केलेले आहे. गर्दीमुळे रोगाच्या प्रसाराबाबत चिंता निर्माण झाली. पण आता ते मागे ठेवून रोगप्रसार कसा रोखता येईल यावर लक्ष केंद्रित करावयास हवे. कोणत्याही समाजाला दोष देणे किंवा प्रसाराचा ठपका ठेवणे हे बरोबर नाही, असे मत पवार यांनी जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे व्यक्त केले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवार यांनी ही माहिती दिली.

देशात संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे बर्‍याच समस्यादेखील निर्माण झाल्या आहेत. परंतु महामारीचा सामना करणे अपरिहार्य असल्याने त्या बाबतीत राज्यनिहाय विचार व्हावा. आरोग्याशी, लोकांच्या जीविताशी तडजोड न करता काही भागांत  लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत विचार करता येईल का, हेही पाहावे, यासह अन्य विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याची माहिती पवार यांनी दिली. कोरोनानंतर आर्थिक संकटे ओढवल्यास काही कडक उपाययोजना कराव्या लागतील. त्या दृष्टीने नॉन-प्लॅन एक्‍सपेंडिचर म्हणजे नियोजनबाह्य खर्चावर कात्री लावावी लागेल. केंद्र शासनाचा विचार नवीन संसद भवन बांधण्याचा आहे. त्याची आवश्यकता तपासून ते लांबणीवर टाकता येईल का, याचाही विचार व्हावा असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. मात्र मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्यामार्फत तसे झाल्यास राज्यात दोन सत्ताकेंद्रे होणार नाहीत. तसेच समन्वयामध्ये चूक होणार नाही, असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले.

स्थलांतरितांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार बंद असल्यामुळे बरेचसे लोक जागोजागी अडकून पडले आहेत. अशा लोकांसाठी स्वयंसेवी संस्था आणि सरकार अन्नपाणी, तात्पुरता निवारा या बाबतीत लक्ष पुरवत आहे. परंतु केंद्र सरकारने अशा स्वयंसेवी संस्थांनादेखील हातभार लावावा. ज्याच्याकडे आधार कार्ड अथवा रेशन कार्ड नसेल अशा व्यक्तींपर्यंतसुद्धा अन्न पोहचले पाहिजे. या देशात अन्नसुरक्षा कायदा अमलात आला असल्याने कोणीही उपाशी राहू नये याची काळजी केंद्र सरकारने घ्यावी. समाजातील काही घटक, मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये जातीयतेचा रंग देणे, दोन समाजांमध्ये भेदभाव व द्वेषाची भावना पसरवणे हा प्रकार होत असेल तर अशा शक्तींचा वेळीच बंदोबस्त करावा. मीडियालादेखील विनंती आहे, एखादी गोष्ट पुनःपुन्हा दाखवून समाजामध्ये क्लेश निर्माण होणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

दरम्यान यावेळी शरद पवार यांनी सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊन कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्याच्या दृष्टीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चांगला संवाद आयोजित केला, त्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले; शिवाय ही जागतिक समस्या असल्याने सर्व राजकीय पक्ष आपले उचित सहकार्य देतील असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.


Web Title : It is not right for any community to blame for the spread of Corona – Sharad Pawar talks with PM Modi

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)