भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही!, भाजप-मनसे युतीसंदर्भात नांदगावकर यांचे संकेत

Bala Nandgaonkar

नागपूर : आम्ही आता पर्यंत स्वतंत्र लढत आलो मात्र भविष्यात काय होईल हे आज सांगता येणार नाही. जनतेच्या हितासाठी काही पक्ष एकत्रित येतात तर भविष्यात कोणासोबत गेलो तर त्यात काही वाईट आहे असं वाटत नाही मात्र अजून काहीही ठरलं नाही, असं म्हणत मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी भाजपसोबत (BJP) युती करण्यासंदर्भात सूचक विधान केले. ते आज नागपूर येथे आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी नांदगावकर म्हणाले की, ठाकरे सरकारने राजकीय नेत्यांना दिलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत अनेक नेत्यांची सुरक्षा यंत्रणा कमी केली. यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचाही समावेश आहे. राज ठाकरेंसोबत इतरही नेत्यांची सुरक्षा कमी केली आहे. ज्या दर्जाची सुरक्षा होती ती कमी केल्याने आम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बोललो. आता एक कमांडो वाढविला आहे. मात्र राज ठाकरे यांना असलेला धोका बघता सरकारने सुरक्षेचा योग्य निर्णय घ्यावा. आम्हाला त्या संदर्भात कोर्टात जाण्याची आवश्यकता वाटत नाही, असं सांगताना आम्हीसुद्धा त्यांच्या सुरक्षेसाठी तयारी केली आहे, असं सांगायला नांदगावकर विसरले नाहीत.

नांदगावकरांच्या विदर्भ दौऱ्यात मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा होती. यावर बोलताना नांदगावकर म्हणाले, आमच्या पक्षात कोणी नाराज आहे असं मला वाटत नाही. राजू उमरकर हे फक्त आले नाही कारण त्यांची प्रकृती ठीक नाही कोणाची नाराजी आहे असं वाटत नाही आणि अस झालंही असेल तर हे कुटुंब आहे, अशा गोष्टी कुटुंबात होत असतात, असं ते म्हणाले.

धनंजय मुंडे प्रकरणावरुन राज्यात जोरदार घडामोडी घडत आहेत. विविध राजकीय पक्षाचे नेते याप्रकरणी आपली भूमिका मांडत आहेत. याच प्रकरणावर नांदगावकर यांना विचारलं असता, धनंजय मुंडे यांनी स्वतः सांगितलं आहे की चौकशी करा तर मग चौकशी व्हायला पाहिजे, असं नांदगावकर म्हणाले.

नांदगावकरांच्या विदर्भ दौऱ्यात प्रमुख नेत्यांची दांडी…

विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गटबाजीचं ग्रहण लागल्याची चर्चा आहे. नांदगावकर यांच्या दौऱ्यात विदर्भातील प्रमुख नेत्यांनी दांडी मारली. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या तोंडावर मनसेमध्ये नाराजीनाट्य पसरल्याचं बोललं जात आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर विदर्भाच्या दौऱ्यावर होते. मात्र मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर दौऱ्यात दिसले नाहीत. गटबाजीमुळे विदर्भातील मनसेचे प्रमुख नेते नाराज आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER