चाळीसगावची जागा जिंकणं आता कठीण नाही – एकनाथ खडसे

Jayant Patil - Eknath Khadse

जळगाव :- ‘महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एक नंबरचा पक्ष आहे. जळगाव जिह्यातही तो एक नंबरवर यायला हवा. हे यश खेचून आणायचं आहे. संघटनेचा विस्तार झाल्याशिवाय निवडणुकीत जिंकता येत नाही. माणसं जोडा, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवा, संपर्क वाढवा. ही जागा निवडून आणणं मोठी गोष्ट नाही,’ असा विश्वास एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते, जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या समोर व्यक्त केला. ‘या तालुक्यातील कार्यकर्ता हा नेत्यावर प्रेम करणारा आहे. मागे जे झालं ते विसरा आणि कामाला लागा, असं सांगतानाच, राजीवदादा तुझ्या पाठिशी आहोत,’ असं आश्वासनही खडसे यांनी दिलं. यावेळी भाजपमधील डझनभर खडसे समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्तानं काल जयंत पाटील जळगावात होते. यावेळी जयंत पाटील यांनी मागील निवडणुकीत झालेल्या पराभवाची उपस्थितांना आठवण करून दिली.

ते म्हणाले, ‘2019 च्या विधानसभा निवडणुकीत आपण चाळीसगावमध्ये 4 हजार मतांनी पराभूत झालो. परंतु 2024 च्या निवडणुकीत याची परतफेड करा. 2024 साली ही जागा निवडून यायलाच हवी. महिला, युवक, युवती, विद्यार्थ्यांनी झपाटयाने कामाला लागा. कार्यकर्त्यांची एक मोठी फळी इथं आहे. नेते व पदाधिकाऱयांबद्दल असलेल्या सहानुभूतीचं रूपांतर मतांमध्ये करा, असे सांगितले.

तसेच पाटील यांनी यावेळी एकनाथ खडसे यांचे कौतुकही केले. खडसे साहेबांसारखे अनुभवी नेते आपल्याला मिळाले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फार उपयोग होईल याबाबत मनात शंका नाही,’ असं पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER