जलयुक्त शिवाराची चौकशी लावली म्हणून अजित पवारांमागे ‘ईडी’ लावली म्हणणे योग्य नाही – चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil - Ajit Pawar

सांगली :  ‘जलयुक्त शिवार’ योजनेबाबत राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची चौकशी लावली म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीही ‘ईडी’मार्फत (ED) चौकशी लावली, असे म्हणणे योग्य नाही. असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच, ‘जलयुक्त शिवार’ (Jalyukt Shivar) योजनेबाबत आम्ही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.

एखाद्या गावात भ्रष्टाचार झाला असेल तर संपूर्ण जलयुक्त शिवार योजनेतच गैरव्यवहार झाल्याचा महाविकास आघाडी सरकारचा आरोप हास्यास्पद असल्याचा टोला मारतानाच खुशाल चौकशी करा, तुम्हाला अडवतंय कोण? असे आव्हानच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. राजकीय सूडभावनेने घेण्यात आलेल्या अशा निर्णयांना आम्ही घाबरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आरेमधून कारशेड हलवणे अंगाशी आल्यानेच जलयुक्त योजनेच्या चौकशीचा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला.

मात्र, आमच्यामागे चौकशी लावली म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांमागे ईडीची चौकशी लावली असे म्हणणे योग्य नाही असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले.

तसेच, चंद्रकांत पाटील म्हणाले, सांगली महापालिकेत भाजपची सत्ता आहे. घनकचरा प्रकल्पाच्या निविदेमध्ये अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी दूर करून नव्याने निविदा काढण्याची आमची भूमिका आहे. मात्र, आयुक्तांनी स्थायी समितीत रद्द केलेला ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठवला आहे. सरकारने तो ठराव विखंडित केल्यास आम्ही कोर्टात जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER