राष्ट्रध्वजाच्या रंगाचा केक कापून खाणे हा गुन्हा नाही – मद्रास हायकोर्ट

Madras High Court

मद्रास हायकोर्ट: गुन्हा निव्वळ कृतीने नव्हे हेतूने ठरतो

चेन्नई :- नकाशावरील भारताच्या आकाराचा आणि भारतीय राष्ट्रध्वजाच्या रंगांचा केक सार्वजनिक समारंभात कापून खाणे हा राष्ट्रध्वजाचा अपमान करण्याचा गुन्हा ठरत नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने (Madras High Court) दिला आहे..

न्या. एन. आनंद व्यंकटेश यांनी हा निकाल देताना म्हटले की, १९७१ च्या राष्ट्रीय सन्मानचिन्हंच्या अपमान प्रतिबंधक कायद्यानुसार (Prevention of Insult to National Honour Act) राष्ट्रध्वजाचा हेतूपुरस्सर आणि जाहीरपणे अपमान करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे हा गुन्हा घडला आहे की नाही हे ठरविताना केवळ कृतीकडे नव्हे तर ती करणाºयाच्या हेतूकडेही पाहावे लागेल. कृती वरकरणी राष्ट्रध्वजाच्या अयोग्य वापराची वाटत असली तरी ती सहेतूक नसेल तर तो गुन्हा होत नाही.

सन २०१३ मधील नाताळाच्या दिवशी कोयम्बतूर शहरात एका कार्यक्रमात नकाशात दिसणाºया भारताच्या आकाराचा, भारतीय राष्ट्रध्वजाच्या तिरंगी रंगाचा आणि त्यावर मध्ये अशोकचक्र काढलेला ६ फूट लांब व पाच फूट रुंदीचा केक कापला गेला होता. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि सुमारे एक हजार शाळकरी मुलांसह एकूण २,५०० व्यक्ती त्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

हिंदू पब्लिक पार्टीचे एक पदाधिकारी जी. सेंथीलकुमार यांनी या संदर्भात कोयम्वतूरच्या न्याय  दंडाधिकार्‍यांकडे फौजदारी फिर्याद दाखल केली. त्यांचे म्हणणे असे होते की, उपर्युक्त कायद्यानुसार कोणत्याही वस्तूपासून बनवलेला राष्ट्रध्वज जाळणे, फाडणे, त्याचे तुकडे करणे, पायदळी तुडविणे किंवा त्याचा अपमान होईल अशी कोणतीही कृती करणे हा गुन्हा आहे. दंडाधिकार्‍यांनी हे म्हणणे प्रथमदर्शनी मान्य करून कार्यक्रमाच्या आयोजकांवर खटला चालवण्याचा आदेश दिला होता. राज्य सरकारने त्याविरुद्ध याचिका केली. ती मंजूर करून वरीलप्रमाणे निकाल देत न्या. व्यंकटेश यांनी तो खटला रद्द केला.

न्या. व्यंकटेश यांनी म्हटले की, प्रस्तुत प्रकरणात फिर्यादीत दिलेली तथ्ये जशीच्या तशी मान्य केली तरी केक कापण्याच्या या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांच्या मनात कार्यक्रमाहून परत जाताना काय भावना होती याचा विचार केला तरी हेतू स्पष्ट होऊ शकतो. सर्व लोक नक्कीच देशप्रमाच्या भावनेने  प्रेरित होऊनच परत गेले असणार हे उघड आहे. त्यावरूनच अशा प्रकारचे केक कापण्यामागचा हेतू राष्ट्रध्वजाचा आणि पर्यायाने देशाचा अपमान करण्याचा खचितच नव्हता हे स्पष्ट होते.

एक काल्पनिक उदाहरण देत न्यायालयाने म्हटले की,स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनाच्या कार्याक्रमात हजारो लोक सहभागी होतात. त्यांना कपड्यावर लावण्यासाठी राष्टध्वज दिला जातो. कार्यक्रम संपल्यावर हे सर्व लोक राष्ट्रध्वज कायमसाठी अंगावर बाळगत नाहीत. ते सर्व राष्ट्रध्वज शेवटी कचºयात जातात. मग अशा कार्यक्रमात सहभागी होणाºया प्रत्येकावर या कायद्यानुसार असाच खटला भरावा का? कायद्यास अभिप्रेत असलेल्या ‘राष्ट्रध्वजाच्या अपमाना’ असा अतिरेकी अर्थ लावला जाऊ लागला तर   लोक राष्ट्रध्वज हातात घ्यायलाही तयार होणार नाहीत. अशा कार्यक्रमांच्या वेळी देशाभिमानाचे प्रतीक म्हणून लोकांना राष्ट्रध्वज दिला जातो. लोकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण झाले की राष्ट्रध्वज देण्याचा उद्देश सफल होतो.

देशाभिमान म्हणजे राष्ट्रभक्ती नव्हे
न्यायालयाने म्हटले की, भारतासाख्या लोकशाही देशात राष्ट्रवाद खूप महत्वाचा आहे. पण राष्ट्रवादाचे अतिरेकी स्तोम माजविणे आपल्या उज्ज्वल भूतकाळास विसरण्यासारखे होईल. हाती राष्ट्रध्वज घेऊन राष्ट्रप्रेमाचा जोश दाखविणाराच फक्त राष्ट्रभक्त असतो असे नाही तर सुशासनाचा आग्रह धारणाही तेवढाच देशप्रेमी असतो. उदात्त विचार चहूबाजूंनी आत शिरू देण्यासाठी मनाची कवाडे उघडी ठेवा, असे ऋग्वेदाने आपल्याला सांगितले आहे.

ही बातमी पण वाचा : फादर स्टॅन स्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER