दिलेला शब्द पाळणं हे माझं हिंदुत्त्व आहे – मुख्यमंत्री ठाकरे

CM Thackeray

माझं हिंदुत्त्व कालंही होतं. आजही आहे. उद्याही राहील. तुम्ही माझ्यासोबत असता तर आज मी घरी बसून टीव्हीवर हे कामकाज पाहिलं असतं.


मुंबईः शिवसेना नेहमीच हिंदुत्त्वाच्या मुद्द्याला आपली ढाल करून लढली आहे. मात्र, 2019 च्या निवडणूक निकालानंतर हिंदुत्त्व विरोधी पक्षासोबत युती करून सत्तेत बसली आहे. त्यामुळे सामान्यांपासून सर्व पत्रकारदेखील शिवसेनेला हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सेक्युलिरीज आणि हिंदुत्त्वासंदर्भातील प्रश्नांची विचारणा करत आहेत. परंतु पहिल्यांदाच विधानसभा हाऊसची पायरी चढणारे मुख्यमं6ी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि उपस्थितांनाही अतिशय योग्य शब्दात आपले उत्तर दिले आहे.

विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेत्यांच्या अभिनंदनाच्या ठरावात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ”आमचे हिंदुत्व कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहील, पण आमच्या हिंदुत्वात शब्द पाळणं येतं. जय श्रीराम म्हणायचं अन् दिलेलं वचन तोडायचं हे माझं हिंदुत्व नाही,” अशी कोपरखळीही उद्धव ठाकरेंनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. अभिनंदन करतानाच त्यांनी निवडणूक निकालापासून भाजपबद्दल मनात असलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. फडणवीस यांचा त्यांनी मित्र म्हणून उल्लेख केला. समोर तुमच्यासारखे मित्र आहेत. हो! तुमच्यासोबतची मैत्री मी कधीही लपवून ठेवलेली नाही आणि त्यात अंतरही पडणार नाही, मी गेल्या पाच वर्षांत तुमच्याकडून खूप शिकलो,असे ठाकरे म्हणाले.

तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले, आयुष्य हे एक रंगभूमी आहे. मी नशिबानं इथे आलोय आणि मायबाप जनतेनं मला इथे बसवलंय. ‘मी येईन’, असं कधीही म्हणालो नव्हतो तरी मला यावं लागलं. तुम्ही माझ्यासोबत असता तर आज मी घरी बसून टीव्हीवर हे कामकाज पाहिलं असतं.

तुमच्यासोबत होतो तेव्हा मी कधीही दगा दिला नाही. चांगल्या कामांआड आलो नाही आणि कटकारस्थानही केलं नाही. मी शिवसेनेच्या सर्व आमदारांना सांगितले होते की, काळोखात काही करायचे नाही. मध्यरात्री खलबतं करायची नाहीत, असे ठाकरे म्हणाले.

मला शेतकऱ्यांचा सातबाराच कोरा करायचा नाही, त्यांना केवळ कर्जमुक्त करायचे नाही तर चिंतामुक्तही करायचे आहे.

निसर्गाचा लहरीपणा, सरकारमध्ये कोण, विरोधात कोण याच्या महिन्याभरातील लहरीचे तडाखे सर्वांनाच बसले आहेत.

आज आपण एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी आलो नसून त्यासाठी विरोधकांनी सहकार्य करावे आणि त्यासाठी रात्रीही बसावे लागले तर आपली तयारी असेल, असे ठाकरे म्हणाले. ‘मी आपल्याला विरोधी पक्षनेता म्हणणार नाही, आपण एका जबाबदार पक्षाचे नेते आहात मी आपल्याला विरोधक मानत नाही, अशी साद त्यांनी फडणवीस यांना घातली.