‘उद्धव ठाकरेंसारखे मुख्यमंत्री लाभले हे माझे नशीब’, मुंबई महापालिका आयुक्तांचे विधान

Iqbal chahal - Uddhav Thackeray - Maharashtra Today

मुंबई : सध्या देशभरात कोरोना नियंत्रणाच्या मुंबई मॉडेलची चर्चा असून, या मॉडेलचे सूत्रधार मुंबई महानगरपलिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. नुकतीच इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला मुंबईमधील कोरोना नियंत्रण मॉडेलसंदर्भात सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुंबईने ऑक्सिजनचा तुटवडा हा प्रश्न कायमचा कसा सोडवला आणि शहरातील कोरोनाबाधितांची संख्या कशी नियंत्रणामध्ये आणली यासंदर्भातील सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे या मुलाखतीमध्ये इक्बाल सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करताना, उद्धव ठाकरेंसारखी व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून लाभले हे माझं भाग्य असल्याचं म्हटलं आहे.

मुलाखतीमध्ये इक्बाल सिंग यांना मुंबईप्रमाणेच इतर ठिकाणीही कोरोनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. असं असतानाच कोणी कोणती जबाबदारी घ्यावी हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. ही जबाबदारी म्हणजे केवळ राजकीय जबाबदारी नाही तर प्रशासकीय स्तरावरील जबाबदारी वाटून घेताना अनेक ठिकाणी अडचणी येत असल्याचं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना इक्बाल सिंग यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला.

अनेक गोष्टींसाठी मी स्वत:ला नशीबवान असल्याचे समजतो. पहिली गोष्ट म्हणजे मला असे मुख्यमंत्री मिळाले ज्यांनी मला निर्णय घेण्यासंदर्भात संपूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे मी आवश्यक निर्णय तातडीने घेऊ शकतो. हे स्वातंत्र्य इतर अनेक शहरांमध्ये काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना मिळाले नाही. दुसरी बाब म्हणजे मी मागील मे महिन्यामध्ये मुंबई महापालिकेत कार्यभार स्वीकारला. त्यावेळी मी माझ्या अंतर्गत काम करणाऱ्या टीमला कोरोना लवकर जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आपल्याला एका मोठ्या लढाईसाठी तयारी करणं गरजेचं आहे असं सांगत, ही तयारी कदाचित एक, दोन किंवा तीन वर्षांसाठी असेल. तेव्हापासूनच आम्ही यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली. आता या सर्व यंत्रणा जवळजवळ ऑटोपायलट मोडवर काम करतात. आज दिवसाला दोन हजार, पाच हजार किंवा १० हजार रुग्ण शहरात आढळून आले तरी यंत्रणांवर ताण येत नाही. या यंत्रणा नियोजित पद्धतीने अगदी बरोबर काम करतात. मला कोणाचाही कशासाठीही फोन येत नाही, असं उत्तर इक्बाल सिंग यांनी दिलं.

लॅबकडून थेट रुग्णाला कोरोना अहवाल देण्यावर बंदी घालणारं मुंबई हे देशातील पहिलं शहर होतं. ते लोक सात वाजता कोरोना चाचणीचे अहवाल रुग्णांना द्यायचे आणि त्यानंतर एकच गोंधळ उडायचा आणि बेड्ससाठी धावपळ व्हायची. एका हेल्पलाईनवर काही वेळात हजारो कॉल यायचे. त्यामुळे केंद्रीय नियंत्रण कक्षाचा कारभार कोलमडून पडायचा. आम्ही यंत्रणा उभारल्यावर हे थांबलं. यंत्रणा काम करू लागल्यानंतर रुग्णांबरोबरच नातेवाईकही उगाच रुग्णालयामध्ये धावपळ करायचे थांबले आणि यामुळे विषाणूचा प्रसारही थांबला. नाही तर आधीच्या गोंधळामध्ये एका कोरोनाबाधित व्यक्तीला बेड शोधण्याच्या प्रक्रियेत जवळ जवळ २०० जणांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असायची, असं इक्बाल सिंग यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button