‘मेडिक्लेम’ पॉलिसीत मानसिक आजारांचा समावेश करणे सक्तीचे

Delhi Hc
  • दिल्ली हायकोर्ट म्हणते विमा  कंपन्या भेदभाव करू शकत नाहीत

नवी दिल्ली :- आरोग्यविम्याच्या ‘मेडिक्लेम’ पॉलिसी ग्राहकांना विकताना विमा कंपन्या शारीरिक आजार आणि मानसिक आजार यांच्यात भेदभाव करू शकत नाहीत. या पॉलिसींमध्ये शारीरिक आजारांसोबत मानसिक आजारांचाही समावेश करणे कंपन्यांना सक्तीचे आहे, असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) दिला आहे.

न्या. प्रतिभा एम. सिंग यांनी हा निकाल देताना म्हटले की, केंद्र सरकारने केलेल्या ‘मानसिक आरोग्य कायद्या’च्या कलम २१(४) नुसार आरोग्य विम्याच्या सर्व पॉलिसींमध्ये मानसिक आजारांचाही समावेश असणे सक्तीचे करण्यात आले आहे. हा कायदा २९ मे, २०१८ पासून लागू झाला असल्याने त्या दिवसापासून त्याचे पालन करणे विमा कंपन्यांचे कर्तव्य आहे. तसेच विमा कंपन्या या कायद्यानुसार पॉलिसी देतील याची खात्री करणे ही भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरणाची (IRDAI) जबाबदारी आहे.

शिखा निश्चल या महिलेने  ‘नॅशनल इन्श्युरन्स कंपनी ल.’ या सरकारी सर्वसाधारण विमा कंपनीविरुद्ध केलेली याचिका मंजूर करताना हा निकाल दिला गेला. शिखा निश्चल यांनी उपर्युक्त कायदा लागू झाल्यानंतर या कंपनीकडून ‘मेडिक्लेम’ पॉलिसी घेतली होती. शिखा यांनी काही मानसिक आजारांसाठी उपचार करून घेतले व पॉलिसीतून त्याचा परतावा द्यावा, अशी विमा कंपनीकडे मागणी केली. परंतु तुम्ही घेतलेल्या ‘मेडिक्लेम पॉलिसी’त मानसिक आजारांचा समावेश नाही, असे सांगून कंपनीने पैसे देण्यास नकार दिला. ‘विमा लोकपालां’कडे (Insurance Ombudsman) दाद मागितली. पण त्यांनीही कंपनीचाच निर्णय योग्य ठरविला होता.

न्या. प्रतिभा सिंग यांनी निकालपत्रात म्हटले की, मानसिक आजारानेही व्यक्तीला अपंगत्व येऊ शकते. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात ही वस्तुस्थिती ठामपणे अधोरेखित झाली आहे. रुग्णाना विलगीकरणात राहावे लागणे, तंदुरुस्त व्यक्तीलाही ‘लॉकडाऊन’मुळे घरात कोंडून राहावे लागणे, ‘वर्क फ्रॉम होम’मुळे वाढणारा ताण आणि नोकरी गेल्याने आलेल्या बेरोजगारीमुळे आत्मविश्वास गमावून बसणे यामुळे असंख्य लोकांना नानाविध मानसिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा मानसिक व्याधींसाठीही विमा उपलब्ध असणे केवळ महत्वाचेच नव्हे तर तीे एक गरज आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button