‘मी नाही तर माझं काम दिसायला हवं, आणि हेच महत्वाचं” , मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

CM Uddhav Thackeray

मुंबई : कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या लोकसंखेवरून विरोधकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाला रोखण्यात आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. आता विरोधकांच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री म्हणजे काही चित्रपटसृष्टीतील हिरो नाही. माझं काम बोललं पाहिजे, मी दिसलो नाही तरी माझं काम दिसायला हवे. आणि तेच महत्त्वाचं आहे,असे म्हणत त्यांनी विरोधकांना प्रतिउत्तर दिले आहे.महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीने या उपक्रमाची सांगता झाली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करत विरोधकांवरही निशाणा साधला. “जे आमच्यावर आरोप करत आहेत त्यांनी इतर राज्यांनी काय केलं हे एकदा पाहावं. राज्य सरकार गोंधळलेलं नाही. आपण मोजून मापून पाऊल टाकत आहोत. आपण मुंबईत तज्ज्ञ डॉक्टरांचे टास्क फोर्स तयार केले, असं कोणत्या राज्यानं केलं? आपल्याकडे व्हेंटिलेटर्सवर असलेले रुग्णही परत आले आहोत. करोनाच्या उपचारात औषधांचं कॉम्बिनेशन आवश्यक आहे. अनुभव संपन्न असलेले लोक आज आरोप करत आहेत. माझ्याकडे प्रशासनाचा अनुभव नसला तरी माझ्याकडे आत्मविश्वास आहे. मी बिलकुल गोंधळलेलो नाही,” असं ते म्हणाले.

ही बातमी पण वाचा : फडणवीस यांनी केले महाआघाडी सरकारला बोलके…

सध्या शाळा सुरू करणं अवघड दिसत आहे. अनेक पर्यायांवर चर्चा सुरू आहे. मुलांना ऑनलाइन शिक्षण देता येईल का?, किंवा शिक्षणासाठी मुलांना अधिकचा डेटा देता येईल का? यासंदर्भातही मोबाईल कंपन्यांशीही चर्चा सुरू आहे किंवा एखाद्या चॅनलवरून काही अभ्यास घेता येईल का? यावर विचार सुरू आहे. अनेक तज्ज्ञांशीदेखील यासंदर्भात चर्चा सुरू आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

सुरूवातीला आम्ही एका रूपयात अनेक प्रकारची चाचणी करण्याची योजना सुरू केली. ते सुरू असतानाचा करोनाचं संकट आलं. परंतु त्या ठिकाणी करोनाची चाचणी होणं सध्या कठिण आहे. यापूर्वी आमच्याकडे टेस्ट किट आल्या होत्या. त्या उघडण्यापूर्वी तो बोगस असल्याचं आपल्याला सांगण्यात आलं, असंही त्यांनी नमूद केलं.

करोनाबरोबर जगायला शिका हे म्हणणं ही आपली अपरिहार्यता आहे. करोनानंतरचं जग बदलेलं असेल. करोनासोबत जगायचं म्हणजे आपल्याला लाईफस्टाईल बदलावी लागणार आहे. आता आपल्याला हळूहळू बंदी उठवावी लागेल. लॉकडाउन हा शब्द म्हणण्यापेक्षा लॉक सोबत घेऊन फिरा असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. मास्क घालणं, सुरक्षित अंतर राखणं, सॅनिटाझर वापरणं असे उपायदेखील आपल्याला करावे लागणार आहेत. सध्या शक्य-अशक्य अशा अनेक गोष्टी आहेत, असंही त्यांनी नमूद केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER