प्रश्न सोडविण्याचाही प्रश्नच !

It is also a question of solving problems!

दररोजच आपल्याला प्रत्येकाला अगदी छोट्या छोट्या निर्णयांना सामोरे जावे लागते. प्रत्येक क्षणाला छोटे-छोटे प्रश्न समोर उभे राहतात. अगदी घड्याळ कसं पुढे धावत तसं ऑफिसला कसा जाऊ? बसने की टॅक्सीने? उद्याच्या प्रोग्राम साठी कपडे कुठले निवडू? एवढेच काय संध्याकाळच्या जेवणाचा मेनू काय ?भाजी कुठली करायची हा सुद्धा एक दिसायला छोटा पण दररोज असलेला मोठाच पेच ! परंतु अशा छोट्या छोट्या प्रश्नांमध्ये निर्णय चुकला तरी फार काही बिघडत नाही. मात्र बरेच निर्णय असे असतात की ते पूर्ण आयुष्यावर, घरादारावर परिणाम करतात. शिक्षणामध्ये कुठली शाखा निवडायची? करिअर कुठल्या फिल्डमध्ये करायचं? व्यवसाय करायचा की नोकरी? जोडीदाराची निवड इत्यादी. याशिवायही जीवनात बरेचदा खूपच क्रिटिकल प्रश्न उभे राहतात आणि अशावेळी नेमका निर्णय घेणे अवघड होऊन बसते. हे प्रश्न काही वैयक्तिक जीवनात असतात तर काही व्यावसायिक जीवनातील असतात.

फार प्राचीन काळामध्ये आदिमानव समोर असणारी संकट ही जैविक स्वरूपाची होती. त्यामुळे त्यांच्यासमोर पर्यायही नव्हते. फ्लाइट, फाइट, फ्रिज! एक तर समोरासमोर लढा द्यायचा, आहे त्या अवस्थेत पडून राहायचं, नाहीतर सरळ पळ काढायचा ! परंतु माणसासमोर असलेली काही जैविक प्रश्न हे तर त्याहीपेक्षा कठीण असू शकतात. जिथे पळ काढणे ही शक्य नसते. उदाहरणार्थ कॅन्सर सारखा जीवघेणा आजार किंवा स्किझोफ्रेनिया सारखे गंभीर मानसिक आजार.

फ्रेंड्स ! निर्णय घेण्याची प्रक्रिया म्हणजे काही सोपं काम नाही हा ! किंवा आनंददायी तर नाहीच नाही. आपल्याला निर्णय घेणाऱ्या लोकांबाबत नेहमी वाटत कि हे लोक किती भाग्यवान आहेत ! सगळी पावर आहे. फार सुखी आहे. पण हे शक्तिशाली नक्की असतात. स्वतःबरोबर इतरांचेही निर्णय घेतानाच त्यांना अधिकार असतो. पण हे लोक सुखी नाहीत कारण त्यांना एक अशा प्रकारचा मानसिक प्रवास करावा लागतो की ज्याचा रस्ता खुपच त्रासदायक अवघड आणि खडतर असतो. निर्णय घेताना अनेक पर्याय सोडावे ही लागतात, ते कोणाच्यातरी आवडीचे असतात. त्यामुळे एक विरुद्ध गटही तयार होतो. बरेचदा मन आदेशाचे पालन करा आणि मोकळा हो हाच मार्ग स्वीकारत.

आपण बघितल्याप्रमाणे काही जैविक स्वरूपाचे गंभीर आजार असतात तिथे आपल्यासमोर पर्याय नसतो. जी परिस्थिती आहे त्याच्याशी लढणे हा एकमेव मार्ग असतो. अशावेळी निर्णयाचा प्रश्नच येत नाही खरेतर !

पण जिथे तुमच्यासमोर पर्याय उपलब्ध नसतात तेव्हा निर्णय पटकन होऊ शकतो. मात्र जास्त पर्याय, जास्त समस्या जटिल होत जाते. उदा. एखाद्या व्यक्तीला अनंत गोष्टींची आवड असेल, तर नेमका कोणतं क्षेत्र निवडावं हे कठीण होणारच. अशावेळी इतर काही क्रायटेरिया यांचा उपयोग करावा लागतो. आवड, इच्छा असणे आणि कृती यामध्ये खूप अंतर आहे. लक्षात घ्यावे लागते.

समस्या निर्माण होतात कारण माणूस एका चुकीच्या पद्धतीने विचार करीत असतो. माझ्यासोबत प्रत्येकच गोष्ट योग्य होत नाही !समोरचा व्यक्ती कधीच बदलणार नाही आहे वगैरे वगैरे या सारखे नकारात्मक विचार मनुष्य करतो. खरं तर कुठलाही प्रश्न सोडवताना एकूण परिस्थितीचा अंदाज घ्यावा लागतो.

  • नेमकी परिस्थिती काय आहे? त्यामध्ये काय बरोबर काय चूक.
  • म्हणजेच एकूणच परिस्थितीचे व्यवस्थित विश्लेषण.
  • संबंधित प्रश्नाविषयी योग्य ती माहिती मिळवणे.
  • निर्णय घेताना तो पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनातून न घेणे
  • निर्णय अतिशय घाईगडबडीने न घेणे.

कुठलाही प्रश्न सोडवताना विचारांची व्यापकता हवी. विचार ठराविक पद्धतीने चाकोरीबद्ध नसावा. निर्णय घेण्याआधी परिणामांचा अंदाज घ्यावा आणि जर त्या चुका जाणवत असतील तर लवचिकता नाही ठेवायला हवी.

मुळात बरेचदा घाईघाईने निर्णय घेणे चुकीचे ठरू शकते. यासाठी निर्णयाप्रत पोहोचणे अवघड वाटते. त्यावेळी तिथे थांबायचे त्या प्रश्नाला त्याचा त्याचा वेळ द्यायचा. अल्बर्ट आईन्स्टाईन चे एक छान वाक्य आहे.”It’s not that I am so smart. It’s just that I stay with the problem longer .”

मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करताना बरेचदा रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासमोरील प्रश्न दिसत राहतात. समाजामध्ये मानसिक आजार आला असलेला stigma, त्यामुळे होत असलेला उपचारांना उशीर, रुग्ण व्यक्तीला दिली जाणारी समाजाकडून वागणूक, एक रुग्ण व्यक्ती घरी असल्या नंतर तिच्या कुटुंबीयांना तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्या, कुटुंबातील इतर भावंडांच्या आयुष्यावर होणारे परिणाम हे जेव्हा समोर दिसतात तेव्हा हा नेमकी समस्या काय असू शकते ? आणि समस्या परिहार किती कठीण आहे किंवा अशा परिस्थितीत निर्णय घेणे किती कठीण आहे हे जवळून बघायला मिळते. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी असणाऱ्या सपोर्ट ग्रुप साठी प्रॉब्लेम सोलविंग किंवा निर्णय घेणे यासारख्या कौशल्यांचा वापर होतो.

अशा सगळ्या समस्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे जी समस्या आहे ती स्वीकारणे. एकदा हा स्वीकार (acceptance)आला की अर्धी समस्या सुटू शकते. परंतु असे होत नाही. कारण या आजाराची लक्षण ही शारीरिक आजारांची सारखी लक्षात येत नाहीत. मुलांचा हट्टीपणा कुणा व्यक्तीचा चिडचिडेपणा , एकटे एकटे राहणे. यासारख्या गोष्टी,” मूल मोठे झाले की समजेल हळूहळू” किंवा” मॅच्युरिटी आली की शांत होईल” किंवा “याचा स्वभावच असा “किंवा “असतात काही जण शांत स्वभावाचे !”अशा स्वरूपामध्ये या प्रश्नांकडे बघितले जाते. म्हणजेच मुळात प्रश्न काय आहे हेच समजत नाही. त्यामुळे से प्रश्नाचा स्वीकार जसा आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे नेमका प्रश्न काय आहे हे समजून घेणे ही खूप आवश्यक आहे. प्रश्न समजल्यानंतर त्याचा स्वीकार करताना नेमकी समस्या काय ? त्यातून उद्भवणाऱ्या इतर समस्या कोणत्या असू शकतील? समस्येची गंभीरता किती आहे? त्याच्या मुळाशी कारणे कोणती असू शकतात ? या प्रश्नातून सोडवताना जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा विचार करता येतो. त्याचबरोबर हे सगळं करताना मला कुठले अडथळे येतात हे समजून घ्यावे .आणि मग जीवनातली ही अतिशय महत्वाची जबाबदारी समजून त्याचा स्वीकार करावा.

मग समोर असलेले पर्याय , कुठे कोणत्या सोयी उपलब्ध आहेत ? रुग्णाशी वागताना कुठली काळजी घ्यायला हवी ? कुठले रुग्णाचे विचार चुकीचे आहेत ? त्यांच्या भावनांची हाताळणी कशी करायला पाहिजे? याबरोबरच आपल्या स्वतःच्या भावनांची हाताळणी आणि मन :शांती कशी टिकून राहील याचा विचार करावा लागेल .ठीकठिकाणी हॉस्पिटल्स मधून असे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी सपोर्ट ग्रुप चालतात. त्याचा फायदा घ्यायला हवा.

फ्रेंड्स ! आपण हे एका समस्या विषयी बोललो .इतरही समस्यांना हेच प्रश्न विचारून आपण निर्णयाप्रत पोहोचू शकतो. हे फक्त लक्षात ठेवा बाकी कुठलाही निर्णय पूर्ण चूक किंवा पूर्ण बरोबर कधीही नसतो. म्हणून निर्णय घेणे टाळण्यापेक्षा , छोटे छोटे निर्णय घ्यायला सुरुवात करायची म्हणजे त्याचे चुकीचे परिणाम असले तरी नुकसान होणार नाही. आणि निर्णय घेण्याची सवयही लागेलं.

ह्या बातम्या पण वाचा : 

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER