‘तुम्ही आमच्या थोबाडीत मारलं तरी हरकत नाही’, चंद्रकांत पाटीलांची खडसेंना भावनिक साद

Eknath Khadse - Chandrakant Patil

मुंबई :- पक्षांतर्गंत अन्याय झाल्यामुळं नाराज असलेले भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादीत (NCP) जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही एकनाथ खडसे यांना भावनिक साद घातली आहे. एकनाथ खडसे हे आमचे पालक आहेत. बंद खोलीत त्यांनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही. त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्यासाठी दांडे (चॅनेल) समोर जाऊ नये, अशी भावनिक साद चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना घातली आहे.

भाजप कार्यसमितीच्या बैठकीतनंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘खडसे राष्ट्रवादीत जाणार आहेत अशा बातम्या प्रसारमाध्यामांकडून दाखवल्या जात आहेत. पण ते पक्षाचे नुकसान होईल असं काहीही करणार नाहीत. आजच्या बैठकीला ते पूर्णवेळ उपस्थित होते. राष्ट्रगीत आटोपूनच गेले. तुम्ही पत्रकार त्यांना इकडेतिकडे ढकलता, ते पाय रोवून खंबीरपणे भाजपमध्येच आहेत. खडसे आमचे समजूतदार नेते आहेत. आमचे पालक आहेत. आम्ही त्यांची मुलं आहोत. त्यांना इतकंच सांगणं आहे की चुकत असेल तर आमच्या थोबाडीत मारा पण सारखं त्या दांडक्यांसमोर जाऊ नका,’ असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी म्हटलं.

तसेच वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे ज्यांना जग मानते अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार आहेत. छत्रपती शिवराय, शाहू महाराजांचे वारसदार असलेल्या छत्रपती संभाजी राजे, उदयनराजेंबद्दल त्यांनी अनुद्गार काढणे योग्य नाही, असे मत पाटील यांनी अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.

ही बातमी पण वाचा : येत्या चार दिवसांत खडसे राष्ट्रवादीत, पवारांकडून मंत्रिपदाची भेट मिळणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER