‘त्यांना जेलमध्ये टाका’ म्हणणारा अमेरिकी टेनिसपटू होतोय ट्रोल

Isner

अमेरिकेत अश्वेत नागरिक जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्त्युवरुन उठलेल्या वादळात अमेरिकेचा उंचपुरा धिप्पाड टेनिसपटू जॉन इस्नर हा आपल्या विधानांनी निदर्शकांच्या टीकेचे लक्ष्य बनला आहे. जगभरातील नामवंत खेळाडू फ्लॉईडवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आणि निदर्शकांच्या ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ आंदोलनाच्या समर्थनार्थ नामवंत खेळाडू बोलत असताना जॉन इस्नरने मात्र या निदर्शकांच्या विरोधात भूमिका घेतली आहे आणि या सर्व निदर्शकांना अटक करा असे म्हटले होते. व्हाईट हाऊसबाहेर जमलेल्या निदर्शकांचे त्याने कीव येण्याजोगे अराजकवादी असे वर्णन केले होते. मात्र याचवेळी जॉर्ज फ्लॉयडला न्याय मिळायला हवा असेसुध्दा त्याने म्हटले आहे.

तब्बल 6 फूट 10 इंच उंचीचा हा धिप्पाड टेनिसपटू आपल्या प्रदीर्घ सामन्यांसाठी प्रसिध्द आहे. जागतिक क्रमवारीत तो 21 व्या स्थानी आहे. सेंट जॉन्स चर्चबाहेर निदर्शकांना पांगविण्यासाठी पोलिसांना अश्रूधूर व इतर साधनांचा वापर करावा लागल्यावर इस्नरने ही विधाने केली होती. या घटनेनंतर काही वेळातच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या चर्चमध्ये गेले होते आणि हाती बायबल घेऊन त्यांनी छायाचित्रकारांना पोझ दिली होती. ट्रम्प यांच्या या वर्तनाची धार्मिक नेत्यांनी निंदा केली होती.

यानंतर इस्नरवर नाराजी व्यक्त करताना लोकांनी म्हटलेय की, अश्वेतांचे जगणे धोक्यात असताना याबद्दल तुला संताप का यावा…ख्रिश्चन व्यक्ती म्हणून या घृणास्पद कृत्याचा मी निषेध करतो. हा प्रश्न केवळ जॉर्ज फ्लॉयड पुरताच मर्यादित नाही तर वर्षानुवर्षे चाललेल्या वर्णद्वेषाचा आहे ज्यात कितीतरी कृष्णवर्णी लोकांचा बळी गेला आहे.

याला उत्तर देताना इस्नरने म्हटलेय की, तुमचे म्हणणे चुकीचे आहे. मी या दंग्यांनी नाराज आहे तो यासाठी की यापूर्वी जे लोक या भयानक क्रुरतेचे बळी ठरले आहेत त्यांचा हा अपमान आहे. शिवाय ज्या पध्दतिने हिंसा होतेय, लूटपाट चाललीय ते अयोग्य आहे.

एका चाहत्याने म्हटलेय की एक खेळाडू म्हणून इस्नर आपल्याला आवडत होता पण त्याची ही प्रतिक्रिया धक्कादायक आहे.

इस्नरने म्हटलेय की, तो फक्त ही लूटालूट व दंग्यांच्या विरोधात बोललाय. अमेरिकेच्या जॉर्जिया व मिनेसोटासारख्या भागात जे काही घडलेय ते या देशाच्या नावावर बट्टा आहे. हे अनाकलनीय आहे. एकाने तर इस्नरला या विधानांनी त्याने आपले आयुष्यच धोक्यात आणल्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी अँटिफा गटाचे लोक हे दहशतवादी असून काही निदर्शकांना तर जॉर्ज फ्लाईडचे नावसुध्दा माहित नसल्याचा आरोप केला होता. इस्नरने त्याचे समर्थन केले होते. ट्रम्प यांनी चर्चचा दुरुपयोग केल्याबद्दल आणि तेथून त्यांनी दिलेला संदेश हा जिझस यांच्या शिकवणीच्या विरुध्द असल्याचे वॉशिंग्टनच्या बिशप यांनी म्हटले आहे.

नामांकित गोल्फपटू टायगर वूडस् यानेसुध्दा इस्नरची विधाने बाष्कळ असल्याचे म्हटले आहे. त्याने पोलिसांच्या अतिरेकाविरुध्द बोलण्याऐवजी निदर्शकांविरुध्द बोलणे हे दयनीय आहे. त्याला आपली मते मांडण्यासाठी वेगळे मार्ग होते. एनबीएच्या कितीतरी खेळाडूंनी तसेच केले आहे असे वूडस् यांनी म्हटले आहे. एनबीए स्टार बेन सिमन्स याने ट्रम्पवर टिका करताना म्हटले होते की, कोणता नेता असा असू शकत नाही.

2018 मध्येही इस्नरने ट्रम्प यांना पाठिंबा व्यक्त केला होता. त्यावेळी विम्बल्डन स्पर्धेत प्रदीर्घ सामने खेळत असताना तो म्हणाला होता की ट्रम्प माझे सामने बघायला आले तर आनंदच होईल. मी उपांत्य फेरीत पोहोचलो तर त्यांना व्टिट करेल.मला माहित आहे की बऱ्याच लोकांना ते आवडणार नाही पण मला त्याची पर्वा नाही असे त्याने म्हटले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER