इशान किशनची तुफान फटकेबाजी, झारखंडच्या 422 धावा

Ishan Kishan

इंदूरचे (Indore) होळकर स्टेडियम झारखंडचा (Jharkhand) यष्टीरक्षक कर्णधार इशान किशन (Ishan Kishan) याने आपल्या फटकेबाजीने दणाणून सोडले. त्याने केवळ 94 चेंडूतच तब्बल 19 चौकार व 11 षटकारांसह 173 धावा फटकावून काढल्या. त्यामुळे विजय हजारे ट्रॉफीच्या (Vijay Hazare Trophy) सामन्यात यजमान मध्यप्रदेश विरुध्द (Madhya Pradesh) 50 षटकांतच 9 बाद 422 असा धावांचा डोंगर रचला.

ही भारतात मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये स्थानिक संघाने उभारलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. परदेशी संघात दक्षिण आफ्रिकेने मुंबईत भारताविरुध्द 2015 मध्ये 4 बाद 438 धावा केल्या होत्या.याच्याआधीची कोणत्याही भारतीय संघाची 50 षटकांत सर्वोच्च धावसंख्या 5 बाद 418 होती जी भारताने 2011 मध्ये विंडीजविरुध्द उभारली होती. योगायोगाने तो सामनासुध्दा इंदूर येथेच खेळला गेला होता.

मध्यप्रदेशचे नशीब की 28 व्या षटकात इशान किशन बाद झाला, नाहीतर त्याने कदाचित द्विशतक झळकावले असते आणि झारखंडच्याही कदाचित 500 धावा फळ्यावर लागल्या असत्या. त्यानंतर विराट सिंगने 49 चेंडूत 68 व अनुकूल राॕयने 39चेंडूतच 72 धावा फटकावल्या. या फटकेबाजीमुळे गोलंदाज पुनीत दाते हासुध्दा शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला. त्याच्या 9 षटकात तब्बल 93 धावा चोपल्या गेल्या.

इशान किशनने 42 चेंडूत अर्धशतक फळ्यावर लावल्यानंतर पुढच्या 32 चेंडूतच आणखी 50 धावा फटकावत 74 चेंडूत शतक साजरे केले. 100 ते 150 धावांचा टप्पा त्याने फक्त 12 चेंडूतच गाठला.

त्याच्या 173 धावा हे त्याचे मर्यादीत षटकांच्या सामन्यांतील चौथे शतक आहे आणि त्याची चारही शतके 77 पेक्षा कमी चेंडूत लागली आहेत हे विशेष.

इशान हा 86 चेंडूत 150 धावा करणारा दुसरा सर्वात जलद भारतीय ठरला आहे. त्याच्यापेक्षा जलद तामिळनाडूचा दिनेश कार्तिक आहे ज्याने 2011 मध्ये हैदराबादविरुध्द 83 चेंडूतच नाबाद 154 धावा केल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER