ईशान खट्टर : तब्बूचा ‘सुटेबल बॉय’

Ishan Khattar - Tabu

एंट्रो- बॉलिवूड अभिनेत्री तब्बूही आता वेब सीरीजमध्ये दिसणार असून तिची मुख्य भूमिका असलेली ‘अ सुटेबल बॉय’ ही इंग्रजी वेबसीरीज २६ जुलैपासून ‘बीबीसी-वन’वर दाखवण्यात येणार आहे. या वेबसीरीजचा पहिला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. याचे कारण आपल्यापेक्षा निम्म्या वयाच्या ईशान खट्टरबरोबर तब्बूचे चुंबन दृश्य. ही वेबसीरीज लोकप्रिय होईल असे आतापासूनच म्हटले जाऊ लागले आहे.

प्रख्यात लेखक विक्रम सेठ यांनी ‘अ सुटेबल बॉय’ नावाची कादंबरी काही वर्षांपूर्वी लिहिली होती. ही कादबंरी प्रचंड लोकप्रिय झाली. हीच कादबंरी आता प्रख्यात दिग्दर्शक मीरा नायर वेब सीरीजच्या माध्यमातून घेऊन येत आहे. विशेष म्हणजे बीबीसीवर ही वेबसीरीज प्रसारित केली जाणार आहे. २६ जुलैपासून सुरू होणा-या या वेबसीरीजमध्ये तब्बू आणि ईशान खट्टर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या वेबसीरीजचा ट्रेलर सध्या चांगलाच धुमाकूळ घालत आहे. याचे कारण ईशान खट्टर आणि तब्बूचे प्रेमप्रसंग आणि चुंबन दृश्य.

ईशान खट्टर हा प्रख्यात अभिनेता शाहीद कपूरचा सावत्र भाऊ असून अभिनेता पंकज कपूर आणि नीलिमा अजीम यांचा मुलगा आहे. ईशानची बॉलिवूडमध्ये एंट्री प्रख्यात निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने ‘धडक’ चित्रपटाद्वारे घडवून आणली. नागराज मंजुळेचा मराठीतील सुपरहिट चित्रपट ‘सैराट’ची ही हिंदी रिमेक होती आणि यात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर प्रथमच नायिका म्हणून प्रेक्षकांसमोर आली होती. चित्रपट म्हणावा तितका हिट ठरला नाही; परंतु ईशान आणि जान्हवीकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर मात्र आल्या. असे असताना ईशान खट्टरने वेब मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला आणि आपण सर्व प्रकारच्या पडद्यासाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे. तब्बूकडेही आज अनेक मोठे हिंदी चित्रपट असतानाही तिनेही केवळ मीरा नायर यांच्यामुळेच या वेब सीरीजमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.

‘अ सुटेबल बॉय’मध्ये १९५१ मधील कथानक सादर करण्यात आले असून जवळ-जवळ सहा कथानकांची सुरेख गुंफण करण्यात आली आहे. मेहरा आणि कपूर खानदानाच्या पिढ्यांची ही कथा कादंबरीप्रमाणेच मीरा नायरने वेब सीरीजच्या रूपातही चांगल्या प्रकारे सादर केल्याचे सांगितले जात आहे. लता मेहरा (तान्या मनिक्ताला) या आपल्या सुंदर मुलीचे लवकर लग्न व्हावे म्हणून तिची आई रूपा मेहरा एका योग्य वराच्या शोधात आहे. मात्र लता आपल्या कॉलेजमधील कबीरच्या (दानिश रिझवी) प्रेमात पडलेली आहे. लताची बहीण सविताचा (रसिका दुग्गल) दीर मान (ईशान खट्टर) शहरात चांगलाच चर्चेत आहे. एक लाडावलेला आणि वाया गेलेला हा मान अनेक वाईट गोष्टी करीत असतो. आपल्यापेक्षा मोठ्या कोठेवाली सईदाबरोबर (तब्बू) त्याचे प्रेमप्रकरण सुरू आहे. सईदा शहरातील प्रख्यात गायिका असून अनेक कार्यक्रमांमध्ये तिला गाणे सादर करण्यासाठी बोलावले जात असते. राम कपूर मानच्या पित्याच्या महेश कपूरच्या भूमिकेत आहेत. लखनौमध्ये या वेब सीरीजचे बरेचसे चित्रण झालेले आहे.

कादबंरी उत्कृष्ट असतानाच आता ईशान आणि तब्बूच्या चुंबनदृश्यांमुळे ही वेब सीरीज आणखीनच चर्चेत येऊ लागली आहे. बीबीसी-वन या वेब सीरीजच्या माध्यमातून वेब सीरीज निर्मितीत पाऊल टाकत आहे. ईशान खट्टरनेच वेब सीरीजचा ट्रेलर आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. आणि काही वेळातच लाखो लोकांनी हा ट्रेलर पाहिला. ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली असून ईशान आणि तब्बूची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER