वर्षा गायकवाड काकोडकर, भटकर, वांगचुक यांच्यापेक्षा बुद्धिमान आहेत का : विनोद तावडे

Varsha Gaikwad - Vinod Tawde

पुणे : डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर, सोनम वांगचुक यासारख्या प्रयोगशील शिक्षणतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यावर माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. तावडे म्हणाले, असे असताना यावर शिक्षणमंत्र्यांचा काय आक्षेप आहे, हे अनाकलनीय आहे. वर्षा गायकवाड यांना स्वत:ची बुद्धिमत्ता डॉ. अनिल काकोडकर, डॉ. विजय भटकर यांच्यापेक्षा अधिक आहे असे वाटते का?, असा खरमरीत प्रश्नच तावडे यांनी उपस्थित केला आहे.

एवढी लाचार शिवसेना बघितली नाही : सावरकरावरून फडणवीसांची टीका

विनोद तावडे म्हणाले, राज्य सरकारने सर्व बोर्डांसाठी दहावी इयत्तेपर्यंत मराठी विषय अनिवार्य केला आहे तसेच एमआयईबी अभ्यासक्रमही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून मराठी भाषेचा फायदा काय झालाय? उलट, मराठी माध्यमातील मुले एमआयईबीच्या माध्यमातून आयबी अभ्यासक्रम शिकू शकली असती, हे नाकारून सरकारने त्यांच्यावर अन्यायच केला आहे.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एमआयईबी अभ्यासक्रमातून जागतिक दर्जाचे शिक्षण मराठीतून शिकण्याची संधी मिळाली होती. मात्र, सरकारने हा अभ्यासक्रमच बंद करून शिक्षणाबद्दल त्यांचे विचार किती प्रतिगामी आहेत, हेच दाखवून दिले आहे, असा आरोपही तावडे यांनी केला.

ग्रामीण भागातील मराठी विद्यार्थी हा या अभ्यासक्रमातून शिकला तर डॉक्टर, इंजीनिअर, शास्त्रज्ञ, आर्किटेक्चर, सनदी अधिकारी होण्याच्या शक्यता वाढल्या असत्या. पण दुर्देवाने महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मराठी विद्यार्थी हा अशा कुठल्याही गोष्टीपर्यंत पोहचू नये आणि पोहचायचेच असेल तर इंग्रजी माध्यमातूनच पोहचले पाहिजे, असा अट्टाहास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि श्रीमती वर्षा गायकवाड यांचा कां आहे हे न समजण्यासारखे आहे, अशी टीकाही तावडे यांनी केली.