उद्धव ठाकरेंचा अनुभव कमी पडतोय का? या प्रश्नाला अमित शहांनी दिले हे उत्तर

Amit Shah-CM Uddhav Thackeray

नवी दिल्ली :- देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. आजच्या घडीला देशात कोरोना रुग्णांचा आकडा पावणेदोन लाखांच्या पुढे गेला आहे. यातील ६५ हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळून आले आहे. कोरोनाच्या लढाईत राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कमी पडत असल्याचा आरोप भाजपाकडून वारंवार होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीगाठीदेखील घेतल्या.

भाजपाचे खासदार नारायण राणेंनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. यावर पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शहांनी भाष्य केलं आहे. देशातल्या प्रत्येक राज्यानं कोरोनाविरुद्ध जोरदार संघर्ष केला आहे आणि अजूनही त्यांचा संघर्ष सुरूच आहे. या लढाईकडे आकड्याच्या दृष्टिकोनातून बघायला नको. हे राज्य अपयशी ठरलं, ते यशस्वी झालं, असं आकडेवारी पाहून ठरवायला नको. ही लढाई प्रत्येकाची आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारं, देशातील जनता सगळेच जण कोरोनाशी संघर्ष करत आहेत.

ज्याला जसं शक्य होतं आहे, त्या परीनं उत्तम प्रकारे संघर्ष करत आहे, असं अमित शहा म्हणाले. ते ‘आज तक’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते. महाराष्ट्रात भाजपा खासदार नारायण राणेंनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यावर अमित शहांनी पहिल्यांदाच त्यांचं मत व्यक्त केलं.

ती त्यांची वैयक्तिक मागणी आहे. ती भाजपाची अधिकृत मागणी नाही. प्रत्येक राज्यानं त्यांना शक्य होतं, तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आहे, असं शहा म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा प्रशासकीय अनुभव कमी पडतोय का? असा प्रश्नदेखील अमित शहांना विचारण्यात आला. त्यावर मी या मुद्द्यावर कोणतंही भाष्य करणार नाही. प्रत्येक राज्यातल्या सरकारनं, तिथल्या प्रशासनानं कोरोनाविरुद्धच्या लढाईत चांगलं काम केलं आहे, असं उत्तर शहांनी दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER