सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का? मुख्यमंत्री का बोलत नाहीत?- देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray

मुंबई :- उच्च न्यायालयाने अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर काही तासांतच अनिल देशमुखांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या प्रकरणावर भाष्य केले आहे. न्यायालयाने जो निर्णय दिला, त्या निर्णयानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, हे अपेक्षित होते. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्याचे माध्यमांद्वारे लक्षात आले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे मौन अस्वस्थ करणारे
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणी त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. इतक्या भयावह घटना महाराष्ट्रात झाल्या, कधी नव्हे अशा प्रकारचे आरोप मंत्र्यांपासून पोलिसांपर्यंत लागले. पण मुख्यमंत्री यासंदर्भात चकार शब्दही बोलत नाहीत. अजूनही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे मौन अस्वस्थ करणारे आहे. किमान अशा परिस्थितीत तरी त्यांची प्रतिक्रिया यायला हवी होती. मुख्यमंत्र्यांची शेवटची प्रतिक्रिया ‘वाझे काय लादेन आहे का?’ अशी होती. मुख्यमंत्र्यांनी चूक झाली तर आम्ही ती सुधारू, असे जनतेला सांगितले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अनिल देशमुखांनी राजीनामा देण्यास आधीच उशीर केला. आमची अपेक्षा अशी होती की, इतके गंभीर आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तत्काळ अनिल देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी पक्षाने आणि पवारसाहेबांनी घ्यायला हवा होता. परंतु त्याकरिता उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली. अशा गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून समोर यायला पाहिजेत; पण तशा पद्धतीने आलेल्या नाहीत, असेही देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.

या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का?
“नैतिकता कधीही आठवली तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारावा लागेल. मी पुराव्यांच्या आधारे माझी भूमिका मांडत होतो; पण मला उत्तर देणारे टोलवाटोलवी करत होते. पुराव्यांनिशी मी ज्या गोष्टी मांडत होतो, ते आता न्यायालयानेही स्वीकारल्याचे मला समाधान आहे. सचिन वाझेचे बॉस अजून सापडलेले नाहीत. सचिन वाझेचा हँडलर शोधणे गरजेचे आहे.” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ही बातमी पण वाचा : फडणवीसांनी घेतलेल्या भूमिकेचं जितेंद्र आव्हाडांकडून कौतुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button