‘आरोपी राक्षस आहे की काय?’

असे विचारत फाशीला स्थगिती

Court

नवी दिल्ली : आरोपीने केलेला खून हे ‘भयंकर स्वरूपाचे राक्षसी कृत्य’ आहे असे एकीकडे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने त्या आरोपीला ठोठावलेली फाशीची शिक्षा मात्र शुक्रवारी स्थगित केली. राजस्थानमधील मोहन सिंग नावाच्या आरोपीने केलेले अपील सुनावणीस आले तेव्हा त्यातील खुनाचा तपशील वाचून सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांनी त्याच्या वकिलास विचारले, तुमचा अशिल काय राक्षस वगैरे आहे की काय? खुनाचे एवढे भयंकर प्रकरण आमच्यापुढे याआधी कधी आले नव्हते. खुनाचे वर्णन वाचून आम्हाला कमालीचा धक्का बसला आहे.

खंडपीठावर सरन्यायाधीशांसोबत न्या. ए.एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामसुब्रह्मण्यन हे इतर न्यायाधीश होते तर आरोपी मोहन सिंग याच्यासाठी सरकारतर्फे दिलेले वकील म्हणून ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा उभे राहिले होते. मोहन सिंगने एका महिलेचा वीजेच्या तारेने गळा आवळून खून केला होता. त्यानंतर त्याने त्या महिलेचे पोट फाडून तिचे काही अंतर्गत अवयव काढून फेकून दिले. तिच्याच अंगावरील तिचे पकडे तिच्या पोटाच्या पोकळीत कोंबून मोहनसिंगने तिचे पोट पुन्हा तारेने शिवून टाकले होते. याच अमानुषतेमुळे सरन्यायाधीशांनी त्याचा उल्लेख ‘राक्षस’ असा केला होता.

गेल्या वर्षी मे महिन्यात हा खून झाल्यानंतर अवघ्या नऊ महिन्यांत खटला पूर्ण करून सत्र न्यायालयाने मोहनसिंगला फाशीची शिक्षा ठोठावली होती. राजस्थान उच्च न्यायालयाने ७ ऑगस्ट रोजी ती शिक्षा कायम केल्याने आता त्याविरुद्धचे अपील सर्वोच्च न्यायालयात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER