शिवसेनेची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी संजय राऊत राष्ट्रवादीवर आगपाखड करतायेत का?

Sanjay Raut - Maharastra Today

मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलेल्या संजय राऊतांनी शरद पवारांचं मन वळवत महाविकास आघाडी घडवून आणली. विचारधारा आणि कार्यपद्धतीत टोकाचा फरक असणाऱ्या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. “सरकार पाच वर्ष टिकेल, दम असेल तर सरकार पाडून दाखवा.” अशी भाषा संजय राऊत प्रत्येक मुलाखतीत वापरत होते. आता मात्र चित्र बदलल्याच दिसतंय. मनसुख हिरेन प्रकरणात शिवसेना राष्ट्रवादीची कोंडी करु पाहते आहे, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणनं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून संजय राऊतांनी आपल्याच सरकारमधील गृहमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर निशाणा साधलाय. अनिल देशमुख अपघाताने गृहमंत्री झाले, असा गौप्य स्फोट करायला देखील राऊतांनी मागं पुढं पाहिलं नाही. यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातली दरी वाढत असल्याचं समोर येतंय.

गृहमंत्र्यांवर कडवी टिका

महाविकास आघाडी मनसुख हिरेन प्रकरणात अडचणीत येत असताना चारही बाजूने डॅमेज कंट्रोलचं काम सुरुये. तर दुसऱ्या बाजूला संजय राऊत त्यांच्याच सरकारातील गृहमंत्री अनिल देशमुखांवर सडकून टिका करतायेत, “अनिल देशमुख यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कारण नसताना पंगा घेतला. गृहमंत्र्यांनी कमीत कमी बोलावे. सतत कॅमेऱ्यासमोर जाऊन चौकशीचे आदेश देणे बरे नाही. ‘सौ सोनार की एक लोहार की’. असं लिखाण त्यांनी सामनामध्ये केलंय. ‘पोलीस खात्याचे सॅल्यूट केवळ घेण्यासाठी नसते तर कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून येतो हे विसरून कसे चालेल?’ असं म्हणत राऊतांनी देशमुखांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

राष्ट्रवादीचं चोख प्रतिउत्तर

महाविकास आघाडीवर विरोधक आक्रमकतेने आरोप करत असताना, आता सरकारमधील नेत्यांच्या टिकेला उत्तर देण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आलीये. राऊतांच्या टिकेला अजित पवारांनी तितकंच सडेतोड प्रतिउत्तर दिलं. ते म्हणाले, “महाविकास आघाडीत तीन पक्षांचे सरकार काम करत आहे. यात कोणाला मंत्री पदाची संधी द्यायची हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे. पक्षाच्या नेत्यांचा अधिकार आहे. सरकार व्यवस्थित चालू असताना इतरांनी विशेषत: पक्षातील नेत्यांनी मिठाचा खडा टाकू नये.”

अजित पवारांच्या सुरात सुर मिसळत राष्ट्रवादीचे प्रवक्ते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गृहमंत्र्यांची पाठराखण केलीये. अनिल देशमुख अपघातानं गृहमंत्री झाल्याचा दावा त्यांनी खोडून काढलाय. “अनिल देशमुख २५ वर्षांपासून म्हणजेच पाच टर्म आमदार आहेत. अठरा वर्ष मंत्री म्हणून कामाचा त्यांना अनुभव आहे. तेव्हा ते अपघाताने मंत्री झाले हे आम्ही मान्य करत नाही.” असं ते म्हणाले.

राऊतांची आगपाखड पवारांवरुन तर नाही ना?

मनसुख हिरने हत्या प्रकरण आणि कोरोनाचा वाढता कहर दोन्ही मुद्दे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याशी थेट संबंधित आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. तर दुसऱ्या बाजूला गृह आणि आरोग्य मंत्रालय राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. दोन्ही मुद्दे हाताळण्यात सरकारची पिछेहाट होताना दिसते आहे. या अपयशाची जबाबदारी स्वतः घेण्याऐवजी दुसऱ्याच्या माथी खापर फोडून आपण मात्र नामनिराळे होण्याचा प्रयत्न राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते करत नाहीत ना? असा प्रश्न विचारायला वाव असल्याचं राजकीय विश्लेष्कांच म्हणनं आहे.

पवारांनी रविवारी अमित शहांची अहमदाबादेत भेट घेतली, त्यांच्यात गुप्त बैठक झाली. अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. राऊतांच्या आगपाखडीचं हे देखील कारण असू शकतं असही मत व्यक्त केलं जातंय. युपीएचं अध्यक्षपद पवारांनी स्वीकारावं असं मत देखील राऊतांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केलं होतं. युपीएचं अध्यक्षपद पवारांनी स्वीकार केल्याच्या जबाबदारीमुळं राज्यात भाजपसोबत पुढच्या काळात राष्ट्रवादी युती करणार नाही असा विचार राऊतांचा या संबंधी असू शकतो असं ही म्हणलं जातंय.

भाजपनं राऊतांवर केली टीका

निलंबीत पोलिस अधिकारी सचिन वाझेच्या नियुक्तीला राऊतांनी त्यावेळी विरोध केला होता असं राऊत म्हणालेत. यामुळं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देशमुख दोघांचा निर्णय चुकीचा होता? असं राऊतांना म्हणायच आहे का? या प्रश्नाला तोंड फुटलंय. “सचिन वाझे हा शिवसेनेचा, गृहमंत्र्यांच्या आणि मंत्रिमंडळातील इतर लोकांचा लाडका आणि भरवशाचा माणूस होता, हे स्वतः संजय राऊत यांनीच कबूल केलं आहे. वाझे वसुली करत होता, हे सगळ्यांना माहीत होतं. कृत्य बाहेर आलं म्हणून सारवासारव करण्याचा तुमचा कारभार जनतेला माहीत आहे. ” असं भाजपचं म्हणनं आहे.

Disclaimer :– ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button