संजय राठोडांच्या राजीनामा नाट्यामागं आहे का गटतटाचं राजकारण?

पूजा चव्हाण (Pooja Chavan Sucide case) या युवतीच्या संशयित मृत्युप्रकरणी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही भाजपाकडून (BJP) केली जात असतानाच संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा पाठवला आहे. परंतु राजीनामा स्वीकारण्यावरून शिवसेनेत दोन मतप्रवाह निर्माण झाल्याची माहिती समोर येते.

संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, असे एका गटाचे म्हणणे आहे तर राजीनामा स्वीकारल्यास असा पायंडा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजीनामा स्वीकारू नये असं दुसरा गट म्हणतोय. यामुळं राजीनामा स्वीकारायचा की नाही अशा द्विधा मन:स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असल्याचं बोललं जातंय.

यवतमाळमध्ये रंगतंय शिवसेनंच गटातटाचं राजकारण

यवतमाळच्या खासदार भावना गवळी आणि वनमंत्री संजय राठोड असे दोन प्रमुख गट आहेत. या प्रकरणाचा फायदा घेत संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला जावा, या प्रयत्नात भावना गवळी गट दिसतोय. तर दुसऱ्या हाताला राजीनामा स्वीकारल्यास यापुढे कुठल्याही प्रकरणात विरोधकांकडून असाच दबाव आणण्यात येईल. परिणामी हा पायंडाच पडेल असे एका गटाचे म्हणणे आहे. परंतु उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी संजय राठोड यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. एकनाथ शिंदे यांचा आमदारांवर प्रभाव आहे. त्यामुळे शिंदे गट राजीनामा स्वीकारू नये, अशी मागणी करत आहे. तसेच राजीनामा स्वीकारण्यासाठी स्थानिक गटबाजीतून दबाव आणला जात आहे, असेही शिंदे गटाचे म्हणणे आहे.

काय आहे नेमकं प्रकरणात

टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या आत्महत्येमुळं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. ७ फेब्रुवारीला तिनं पुण्याच्या वानवडी इथल्या इमारतीवरून उडी घेतली. तिच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळं तिचा मृत्यू झाला. या प्रकरणात ११ वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप्स समोर आल्या. यातल्या काही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि याच ऑडिओ क्लिप्सला आधार धरत भाजपनं शिवसेना आमदार, राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना घेरण्याचा प्रयत्न केला.

बंजारा समाजाची काय आहे भूमिका?

संजय राठोड हे बंजारा समाजातून येतात. महाराष्ट्रातील बंजारा समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या भागांतील समाजात त्यांचे प्रचंड वर्चस्व आहे. या प्रकरणात संजय राठोड यांचा हात नसून ते निर्दोष आहेत, असं म्हणत बंजारा समाज राठोडांच्या पाठीशी उभा आहे.

या प्रकरणात संजय राठोड अडचणीत आल्याने त्यांचे समर्थक अधिक सक्रिय झाले. त्यांच्या समर्थकांनी थेट बॅनरबाजी सुरू केली आहे. राठोड यांच्या समर्थनासाठी सोशल मीडियावर अनेक फोटो, मॅसेज, कमेंट्स पोस्ट केल्या. सोशल मीडियावर समर्थकांनी त्यांना समर्थन करणारे अनेक बॅनर पोस्ट केले आहेत.

फेसबुकवरही समर्थकांनी अनेक बॅनर पोस्ट केले आहेत. “जिसकी कामयाबी रोकी नहीं जा सकती, उसकी बदनामी शुरू की जाती है!” अशी पोस्ट एका समर्थकाने फेसबुकवर केली आहे. यासह अनेक समर्थकांनी त्यांच्या समर्थनासाठी फेसबुकवर पोस्ट टाकल्या होत्या.

स्थानिक नेतृत्वातली रस्सीखेच आणि एकनाथ शिंदेंचा राठोडांना असणारा पाठिंबा यामुळं राठोडांचा राजीनामा स्वीकारायचा का नाही, या विचारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, असं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER