संजय राठोड शक्ती प्रदर्शन करुन मुख्यमंत्र्यांवर दबाव आणत आहेत का?

Sanjay Rathod - Uddhav Thackeray

पुण्यात पुजा चव्हाण नावच्या टिकटॉक स्टारनं आत्महत्या केली. या प्रकरणात शिवसेना आमदार आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आलं. या प्रकरणात दिवसेंदिवस त्यांच्यासमोरील अडचणींत वाढ होतीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणासंबंधी बोलताना, सदर प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि संजय राठोड दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं माध्यमांना सांगितलं. या प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने उडी घेतलीये. राज्य सरकार आणि पोलिस दलाला या प्रकरणी नोटीसही जारी करण्यात आलीये.

दरम्यान १५ दिवसांपासून अज्ञातवासात असलेले संजय राठोड माध्यमांसमोर आले. बंजारा समाजातून येणाऱ्या संजय राठोड यांनी बंजारा समाजाचे मुळ शक्तीपीठ असणाऱ्या पोहरादेवी मंदिराला भेट दिली. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी होत्या. कोरोनाचे वाढते रुग्ण आणि विदर्भात होणारा प्रसार हा चिंतेचा विषय असताना देखील आज पोहरादेवी मंदिरात राठोड यांच्यासह हजारो कार्यकर्ते एकत्र जमले होते.

एका बाजूला राज्यात कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री विविध ठिकाणी निर्बंध लावताहेत. लॉकडाऊन करायला लागू नये, अशी परिस्थीती ओढवू नका, असं जनतेला सांगताहेत तर दुसऱ्या बाजूला गंभीर आरोप असलेले त्यांचे मंत्री शक्ती प्रदर्शन करताहेत. राठोड नेमका काय संदेश देऊ पाहताहेत, असा सवाल भाजपकडून केला जातोय.

संजय राठोडांच्या समस्येत वाढ

विरोधी पक्षात असणार्‍या भाजपने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरलीये. संजय राठोडसुद्धा याप्रकरणी मौन बाळगून होते. माध्ममांसमोर यायचं त्यांनी टाळलं होतं. १५ दिवसांपासून ते नॉट रीचेबल होते. अखेर आज सर्वांसमोर येत बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवी याठिकाणी जाऊन दर्शन घेण्याचा निर्णय त्यांनी केला. त्यांच्या या दौर्‍यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.

पोहरादेवी आणि बंजारा समाज

पोहरादेवी हे वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील ठिकाण आहे. बंजारा समाजाचे महंत याठिकाणी असतात. त्यामुळे पोहरादेवीस बंजारा समाजाचे श्रद्धास्थान मानले जाते. संजय राठोड बंजारा समाजातील मोठे नेते आहेत. पुजा चव्हाण प्रकरणात बंजारा समाज त्यांच्या पाठीशी ठामपणे असल्याचे स्पष्ट होते. परिणामी संजय राठोड येणार म्हणून राठोड समर्थकांनी पोहरादेवी याठिकाणी प्रचंड गर्दी केली होती. आणि याच मुद्द्याला धरुन भाजपने संजय राठोड व शिवसेनेवर टीकेची झोड उठवलीये.

मुख्यमंत्र्यांचा पक्ष पाळत नाहीये नियम तर समान्यांचे काय?

मुख्यमंत्र्यांनी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी कोरोनाचे वाढते रुग्ण आणि संभाव्य परिस्थीतीवर बोलताना येत्या काळात लॉकडाउन करण्याची वेळ येवू नये, म्हणून काळजी घ्या, असे आवाहन राज्यातील जनतेला त्यांनी केलं. पण दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पक्षाचे मंत्री गंभीर असताना सुद्धा लाखोंची गर्दी करुन शक्ती प्रदर्शन करतायेत. अशीही टिका विरोधकांकडून केली जातेय.

पोहरादेवी ठिकाणी संजय राठोड यांनी मंदिरात सपत्नीक जाऊन दर्शन घेतले. यावेळी मोठ्यासंख्येने कार्यकर्ते जमले होते. फिजीकल डिस्टंन्सींग, मास्क कोरोनाच्या सर्व नियमांना पार धाब्यावर बसवल्याची परिस्थिती याठिकाणी होती. यावरुन भाजप नेते राठोड यांच्यावर टीका करत आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव ऊपाध्ये यांनी यावर ट्वीट करत मुख्यमंत्र्यांनाच सवाल केले आहे. तर ईतके दिवस संजय राठोड कुठे होते ,असा सवालही प्रविण दरेकर य‍ांनी केला आहे.

भाजपने केलीये टीका

“युवतीच्या मृत्यूप्रकरणात नाव असलेले मंत्री १५ दिवस गायब होतात. मुख्यमंत्री गप्प. मात्र उद्धव ठाकरेंच्या यांच्या आदेशाला हरताळ फासत हे मंत्री सोशल डिसेन्सचा फज्जा उडवत शक्ती प्रदर्शन करतात. सत्तेची अपरिहार्यता असू शकेल, मुख्यमंत्री किमान कोरानाचेनियम मोडल्याचा गुन्हा दाखल तरीकरणार का ?” असं ट्वीट केशव उपाध्येंनी केलंय.

शिवसेनेत पडलेत दोन गट

संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. पोलिस चौकशीस समोर जाण्याची सुद्धा त्यांनी तयारी दर्शवलीये. संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन मात्र सेनेत दोन गट पडल्याचे चित्र आहे. वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी प्रयत्न करत असातनाच. एकनाथ शिंदे संजय राठोड यांची पाठराखण करत असल्याच चित्र निर्माण झालंय

पोहरादेवी मंदिराजवळ बंजारा समाजाची जमवलेली गर्दी हा अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंसाठी संदेश असल्याचे बोललं जातंय. संजय राठोडांच्या मागे इतकी लोकं उभी आहेत आणि काही कारवाई केल्यास यासर्व लोकांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल असा छुपा संदेश आजच्या कार्यक्रमातून ते देत असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात रंगलीये.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER