नागपूरला कुणाची दृष्ट लागली ?

badgeनागपूर वाढते आहे. राज्याचा मुख्यमंत्री इथे राहतो. मोदींच्या टॉप फाइव्ह मंत्र्यांपैकी एक नितीन गडकरी इथे राहतात. स्मार्ट सिटी आहे. मेट्रो रेल्वे धावू लागली आहे. नवनवे उद्योग, नवनव्या राष्ट्रीय कीर्तीच्या संस्था इथे आल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी विधानसभा अधिवेशन आले की धावपळ असे. ते आटोपले की वर्षभर चिडीचूप असे. आता दररोज इथे काही ना काही घडते आहे. नागपूरला जिवंतपणा आला आहे; पण अलीकडच्या काही घटना पाहिल्या तर नागपूरला कुणाची बोहरी नजर लागली, असा प्रश्न पडतो.

गुंडगिरी वाढली आहे. दुष्टशक्ती उधम करत आहेत. मुख्यमंत्र्यांचे शहर असूनही पोलिसांचा धाक नाही. गुंडांची हिंमत वाढली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनाच कायदा हाती घ्यावा लागत आहे. आज शांतिनगर भागात सामान्य लोकांनीच एका गुंडाला संपवले. ह्या अट्टल गुन्हेगाराचा वस्तीला खूप त्रास होता. पोलिसांना माहिती देऊनही उपयोग होत नव्हता. शेवटी लोकांनीच त्याचा काटा काढला. काही वर्षांपूर्वी अक्कू नावाच्या गुंडाला वस्तीतल्या बायांनीच संपवले होते. पोलीस कारवाई करत नसल्याने लोकांनीच गुंडांचा बंदोबस्त केल्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. लोकच परस्पर न्याय करण्याच्या मूडमध्ये आलेले दिसत आहेत.

दोन दिवसांपूर्वी घडलेली घटना तर धक्कादायक आहे. रेडिमेड कपड्यांच्या एका दुकानात ‘ट्रायल रूम’ मध्ये छुपा मोबाईल लावलेला आढळला. खरेदी केलेले कपडे घालून पाहण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या हे लक्षात येताच तिने तो मोबाईल घेऊन थेट पोलीस ठाणे गाठले. दुकानाच्या मालकाला आणि तिथल्या एका नोकराला अटक करून पोलिसांनी तपास चालवला आहे. माणूस किती विकृत होत चालला आहे याचे हे उदाहरण आहे. तुम्ही कुठेही सुरक्षित नाही.
कुठेही जा. कुणीतरी तुमच्यावर नजर ठेवत आहे. मोबाईल तर घरच नव्हे, अख्खी संस्कृती उद्ध्वस्त करायला निघाला आहे. मोबाईलवर नको ते सहज पाहायला मिळते. त्यामुळे लहान वयातच मुले भरकटत चालली आहेत. त्यांचा कान धरायला कुणाला वेळ नाही. प्रत्येक जण धावतो आहे. नागपूर शहर प्रगती करत आहे. धडाक्यात विकास सुरू आहे; पण माणूस आनंदी, समाधानी, बिनधास्त आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधायला कुणाला वेळ आहे? एकट्या नागपूरची ही समस्या नाही. साऱ्याच शहरांना हे प्रश्न सतावत आहेत. त्यातून मानसिक आजार अचानक वाढले आहेत. खरेच आम्ही कुठे निघालो आहोत?