आयुष्यात पैसा महत्त्वाचा की माणसं? याचं उत्तर तुम्हाला राजेश खन्नांची कारकीर्द देऊ शकते!

Maharashtra Today

बॉलीवूडचा (Bollywood)आजवरच इतिहास बघितला तर जे यश स्टार म्हणून राजेश खन्ना यांना मिळालं त्याच्या जवळपास सुद्धा अनेकांना पोहचता आलं नाही. राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचं मूळ नाव ‘जतीन खन्ना’ असं होतं. बॉलिवूडमध्ये त्यांना सर्वजण ‘काका’ नावानेच हाक मारायचे. त्यांनी फिल्मी करिअरमध्ये एकाहून एक हिट सिनेमे दिले. एक कलाकार म्हणून राजेश खन्ना (Rajesh Khanna ) यांनी स्वतःची अशी वेगळी छाप सोडली की आजही त्यांना त्यांच्या हिट सिनेमांसाठी ओळखलं जातं.

त्यांनी एका पाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे दिले आणि भारताचे पहिले सुपरस्टार झाले. मुली त्यांच्या प्रेमात किती वेड्या होत्या याचे किस्से आजही ऐकायला मिळतात. त्यांना एकदा पाहण्यासाठी मुली तासंतास वाट पाहत होत्या. अनेक मुलींनी रक्तानं राजेश खन्ना यांना पत्र लिहलं होतं. एकेकाळी जनतेच्या मनावर राज्य करणारा हा सुपर स्टार माणूस मात्र मनातल्या मनात कमजोर होत होता. त्याला कुणाचाच आधार शेवटच्या टप्प्यात मिळाला नाही. आणि एकांतातच त्यांचा मृत्यू झाला.

ती स्पर्धा जिंकून स्टार झाले

वर्ष होतं १९६५, फिल्मफेअरनं ‘इंडीयन टॅलेंट स्पर्धा’ आयोजित केली होती. राजेश खन्ना यांनी या स्पर्धेत फक्त सहभाग घेतला नाही तर ती स्पर्धा जिंकली देखील. या स्पर्धेमुळं सिनेमांची दारं त्यांच्यासाठी खुली झाली. पुढच्याच वर्षी त्यांनी ‘आखरी खत’ (Aakhari Khat)या त्यांच्या पहिल्या सिनेमात काम केलं. यानंतर त्यांनी ‘राज’ सिनेमात काम केलं. हे दोन्ही सिनेमे इतके गाजले नाहीत.

१९६७ मध्ये ‘बहारों के सपने’ हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमातल्या त्यांच्या भूमिकेमुळं त्यांना ओळख मिळाली यानंतर त्यांनी कधीच मागं वळून पाहिलं नाही. राजेश खन्ना यांनी एकूण १८० सिनेमांमध्ये काम केलं. यातील १६३ सिनेमे हे फिचर फिल्म्स होत्या तर १२८ सिनेमांमध्ये त्यांनी मूख्य भूमिका साकारल्या. २२ सिनेमांमध्ये दुहेरी भूमिका केल्या तर छोट्या- मोठ्या अशा १७ सिनेमांमध्ये काम केलं. १९६९ ते १९७१ या काळात त्यांनी सलग १५ हिट सिनेमे दिले. यानंतर त्यांना बॉलिवूडचा सुपरस्टार हा किताब मिळाला. खामोशी, औरत आणि अराधना त्यांच्या सिनेमांनी राजेश खन्ना यांना रातोरात स्टार बनवलं होतं.

आनंद सिनेमाच्या यशानंतर त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तेव्हा मला मी देवाच्या बाजूला बसल्याचा अनुभव येत होता. पहिल्यांदा मला जाणवलं की यश काय असतं. मला अजूनही आठवतं की बंगळुरू येथे सिनेमाचा प्रीमिअर होता. जवळपास १० किमीपर्यंत रस्त्यावर लोकांशिवाय दुसरं काही दिसतच नव्हतं. त्यामुळंच म्हणलं जातं राजेश खन्नां इतकं मोठं यश कुणाच्याच नशिबी आलं नाही.

अस्त

सुर्य जसा उगवतो, आसमंत व्यापतो, वरती वरती चढत राहतो पण एक वेळ अशी येते की त्याला अस्ताला जावं लागतं. राजेश खन्ना नावच्या सिताऱ्याची चमकसुद्धा बदलत्या वेळेसोबत फिकी पडायला लागली. १९७५नंतर अमिताभ बच्चन यांचा ‘अँग्री यंग मॅन’ लोकांना आवडू लागला. राजेश खन्नांच्या चित्रपटातून सांगितलं जाणारं आयुष्याचं वास्तव लोकांनी नाकारलं होतं. प्रत्येकालाच बच्चन बनायचं होतं. लढायचं होतं. सिनेमा हॉलमधल्या त्या तीन तासांसाठी प्रत्येक जण स्वतःला हिरो समजायचा.

बच्चन यांच्य जंजीर सिनेमानं भारतीय चित्रपटांची शैली बदलली. अमिताभ ‘वन मॅन आर्मी’ होते. लोकांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या विषयी वाढत आकर्षण बघून राजेश खन्ना यांना कळालं होतं की त्यांच्या पर्वाच्या अस्ताला सुरुवात झालीये. त्यांचा स्टारडम त्यांच्यापासून हिरावला जात असल्याचं त्यांना सहन झालं नाही. त्यांनी नशेत समाधान मानलं. इतरांपासून स्वतःला तोडून घेतलं. नंतर ते काही काळ राजकारणात आले. १९९२ साली ते नवी दिल्लीतून खासदार म्हणून निवडू आले होते.

पुन्हा लोकप्रियतेचा कळस गाठण्यासाठी त्यांनी शक्य ते सारे प्रयत्न केले. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात ते ‘बिग बॉस’ मध्ये सहभागी होणार होते परंतू अक्षय कुमारनं तसं होऊ दिलं नाही. राजेश खन्ना यांनी भारतीय सिनेमाला आकार दिला. १८ जुलै २०१३ ला त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा ‘पद्मभूषण’ पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button