महाराष्ट्र ‘आत्महत्येचे डेस्टिनेशन’ होते आहे का? फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोमणा

मुंबई :- गुन्ह्यांच्या चौकशीबाबत लोकांचा महाराष्ट्र सरकारवर विश्वास आहे, असे प्रदर्शन करण्याच्या नादात विधानसभेत गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दोन आत्महत्यांचा आणि तोही चुकीचा संदर्भ दिल्याने सरकारची शोभा झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावरून पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना – महाराष्ट्र आता पर्यटनाचे नव्हे, तर आत्महत्येचे डेस्टिनेशन होतो आहे का? असा टोमणा मारला.

मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणी सरकार संशयित पोलीस अधिकारी सचिन वझे यांना वाचवते आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. वझे यांना निलंबित करून अटक करण्याची मागणी केली.

या मुद्द्याला उत्तर देण्याऐवजी, रायपूर येथील सरकारी अधिकाऱ्याने नागपुरात येऊन केलेली आत्महत्या आणि दादरा नगर हवेलीचे भाजपाचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत केलेली आत्महत्या याचा दाखला देऊन महाराष्ट्र सरकारच्या कायदा व्यवस्थेवर आणि तपास यंत्रणांवर लोकांचा किती विश्वास आहे हे दर्शवण्याच्या नादात गृहमंत्री अनिल देशमुख म्हणालेत की, महाराष्ट्र सरकारकडून न्याय मिळेल या आशेने भाजपचे प्रशासन असलेल्या राज्यातील लोक महाराष्ट्रात येऊन आत्महत्या करत आहेत!

फडणवीसांनी देशमुखांची चूक सुधारली

यावर देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांच्या लक्षात आणून दिले की, राज्याच्या गृहमंत्र्यांनी याची माहिती करून घ्यावी की, रायपूर हे मध्यप्रदेशात नव्हे, तर छत्तीसगडमध्ये येते आणि तिथे काँग्रेसचे सरकार आहे.

महाराष्ट्रात येऊन लोक आत्महत्या करत आहेत याचा गृहमंत्र्यांना आनंद होत असेल तर महाराष्ट्र आता पर्यटनाचा नव्हे, तर आत्महत्येचं डेस्टिनेशन होतोय का? याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी द्यावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER