जोकोवीचची दुखापत म्हणजे ‘लबाड लांडगे ढोंग करतेय आहे का?’

Novak Djokovic

जगातील नंबर टेनिसपटू नोव्हाक जोकोवीचच्या (Novak Djokovic) प्रामाणिकपणाबद्दल पुन्हा एकदा शंका उपस्थित झाली आहे. चौथ्या फेरीच्या सामन्याआधी जोकोवीचने आपल्याला दुखापत झाल्याचे आणि त्यामुळे आपण पुढचे सामने खेळू शकू की नाही याची शंका बोलून दाखवली होती मात्र त्यानंतर चौथ्या फेरीचा सामना तो सहजपणे खेळला आणि त्यात मिलोस राओनीकला (Milos Raonic) 7-6, 4-6, 6-1, 6-4 अशी मात दिली त्यामुळे जोकोवीचचा दुखापतीचा दावा कितपत खरा होता याबद्दलच आता शंंका व्यक्त होत आहे.

जोकोने तिसऱ्या फेरीतील टेलर फ्रित्झवरील विजयावेळी आपल्या पोटातील स्नायू ताणल्या गेल्याचे म्हटले होते आणि त्यामुळे आपण अजिबात सराव करु न शकल्याचा दावा केला होता. पण निक किरयोससह बऱ्याच खेळाडूंनी जोकोवीच हा दुखापतीचे ढोंग करत असल्याचा आरोप केला आहे. सेरेना विल्यम्सचे प्रशिक्षक पॕट्रीक मुर्तोग्लू यांनी तर जोकोवीच हा दुखापतीचे नाटक करुन दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा स्पष्ट आरोप केला आहे. जोकोवीचबद्दल याच्याआधीसुध्दा असे आरोप झाले आहेत.

रिओनिकविरुध्दच्या सामन्यात जोकोवीचने आपला नेहमीचा खेळ केला नसला तरी त्याचे दुखणे खरोखरच एवढे गंभीर होते का, असा प्रश्न आहे. सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत जोकोने ज्याप्रकारे आपल्या तंदुरुस्तीबद्दलचे प्रश्न टाळले त्याने या शंकांना बळकटी मिळाली आहे. आपल्या तंदुरुस्तीसाठी गेल्या 48 तासात काय केले असे विचारले असता तो म्हणाला की तुम्हाला ते जाणून घेण्याची गरज नाही. नेमकी दुखापत काय होती याचा आग्रह धरला असता त्याने पत्रकारांना सांगितले की, स्नायू फाटला की ताणला गेला असे काहीतरी घडले. तुम्हाला ते जाणून घ्यायचे आहे पण मला त्यात पडायचे नाही. मी एमआरआय केलाय. जे आवश्यक आहे ते सर्व मी केलेय. मला माहित आहे ते काय आहे पण मी आता त्याबद्दल बोलू इच्छित नाही. मी अजुनही स्पर्धेत आहे हे तुम्ही जाणून आहात त्यामुळे मी त्याबद्दल कोणताही अंदाज व्यक्त करु इच्छित नाही. राओनिकविरुध्द मैदानावर उतरण्याच्या काही तास आधीसुध्दा मी खेळू शकेल की नाही ते माहित नव्हते. पण वेदना सहन करण्याजोग्या होत्या म्हणून मी खेळलो. आता आहे त्यापेक्षा अधिक त्राससुध्दा होऊ शकतो किंवा चांगलेही होऊ शकते. काहीच सांगता येत नाही आणि वेदनाशामक औषधी घेणे थांबविल्याशिवाय ते कळणारसुध्दा नाही.

व्हिक्टोरिया अझारेंका हिनेसुध्दा पत्रकारांनी आरोग्याबाबत प्रश्न विचारु नये असे म्हटलै होते. कारण या व्यक्तीगत गोष्टी असतात असे तिचे मत आहे आणि जोकोवीचने तिच्या या मताशी सहमती दर्शवली होती. या प्रश्नांवर वैद्यकीय प्रतिनिधींनीच बोलणे योग्य राहिल.

तिसऱ्या फेरीच्या सामन्यात जोकोवीचला वैद्यकीय मदत घ्यावी लागल्यावर चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र फ्रिट्झला वाटले की, जोकोवीच पाचव्या सेटमध्ये तर व्यवस्थित वाटला. तर त्याचा टिकाकार निक किरयोसने त्याची नक्कलसुध्दा करून दाखवली.

सेरेनाचे प्रशिक्षक मोरातोग्लू म्हणाला की, जोकोवीचचे हे मानसिक खेळ आहेत ज्याच्याने तो प्रतिस्पर्ध्यांना दाखवतो की तो व्यवस्थित नाही आणि तो सामना सोडून देऊ शकतो पण नंतर तो भन्नाट खेळ करतो. त्याने बऱ्याचदा असे केले आहे पण तो कधीही दुखापती लपवत नाही.

ऑस्ट्रेलियन टेनिसपटू टॉड वूडब्रिजनेही यापूर्वी असेच आरोप केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER