ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे मालिका खेळायचे धोरण ‘मतलबी’ आहे का?

Cricket Australia

ऑस्ट्रेलियन क्रिकेट (Cricket Australia) संघाने दक्षिण आफ्रिकेचा (Cricket South Africa) दौरा कोरोनाचे (Corona) कारण देत रद्द केल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियावर टीकेची झोड उठली आहे. त्यासोबतच ऑस्ट्रेलिया कसे मोजक्याच संघांसोबत खेळते, आघाडीच्या संघांना प्राधान्य देते आणि कमजोर किंवा खालच्या क्रमांकाच्या संघांना टाळते याची आकडेवारीसुध्दा मांडली जात आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे खेळापेक्षा अधिकाधिक कमाईला प्राधान्य आहे म्हणूनच ते इंग्लंड व भारताविरुध्द अधिकाधिक खेळतात, आता न्यूझीलंडविरुध्दही खेळणार आहेत पण इतर संघांविरुध्द त्यांनी गेल्या काही वर्षात खेळायचे टाळलेच आहे. गेल्या साडेचार वर्षात ते वेस्ट इंडिजविरुध्द एकच सामना (विश्वचषक 2019) खेळले आहेत. याच काळात ते भारताविरुध्द 42 आणि इंग्लंडविरुध्द 32 सामने खेळले आहेत.

विंडीजविरुध्द त्यांचा पुढचा कसोटी सामना 2022 च्या शेवटी आहे. तोवर विंडीजविरुध्द खेळलेल्या शेवटच्या सामन्यापासूनच्या काळात ते भारताविरुध्द 16 आणि इंग्लंडविरुध्द 15 कसोटी सामने खेळलेले असतील. हाच विंडीजचा संघ जेंव्हा फाॕर्मात होता म्हणजे 1980 च्या दशकाच्या आसपास याच ऑस्ट्रेलियाने त्यांच्याविरुध्द चार कसोटी मालिका खेळल्या होत्या आणि आठ वेळा त्यांनी विंडीज संघाला ऑस्ट्रेलियातील तिरंगी वन डे स्पर्धेसाठी आमंत्रित केले होते. त्याकाळात विव्ह रिचर्डस ऑस्ट्रेलियात 73 वन डे सामने आणि वेस्ट इंडिजमध्ये फक्त 33 सामने खेळलेला होता.त्यामुळे विंडीज संघाविरुध्दच्या या आकडेवारीवरुन ऑस्ट्रेलियन संघ कशाला प्राधान्य देतोय हे स्पष्ट होतेय.

दक्षिण आफ्रिकेआधी बांगलादेशविरुध्दची मालिकाही त्यांनी रद्द केलेली आहे.

21 व्या शतकात म्हणजे 1 जानेवारी 2000 पासूनचे सामने पाहिले तर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुध्द 55, भारताविरुध्द 46, दक्षिण आफ्रिकेविरुध्द 33, वेस्ट इंडिजविरुध्द 26, न्यूझीलंडविरुध्द 25, पाकिस्तानविरुध्द 20, श्रीलंकेविरुध्द 18, बांगलादेशविरुध्द 6, झिम्बाब्वेविरुध्द फक्त 2 कसोटी सामने खेळले आहेत. आयर्लंड व अफगणिस्तानविरुध्द अद्याप ते एकही कसोटी सामना खेळलेले नाहीत. ही आकडेवारी बोलकी आहे.

यामुळे ऑस्ट्रेलिया काही मोजक्या संघांसोबतच खेळायला प्राधान्य देते हे दिसुन येत असले तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मात्र याचा इन्कार केला आहे. त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीक हाॕकली म्हणतात की, हे आरोप जेवढ्या स्पष्ट शब्दात नाकारता येतील तेवढ्या स्पष्टपणे मी नाकारतो आहे. अफगणिस्तानविरुध्द न झालेल्या सामन्याबद्दल ते सांगतात की, एकच सामना होता पण त्यासाठी महिनाभर क्वारंटीन राहावे लागणार होते.जाताना व परत आल्यावर…त्यामुळे ते संयुक्तिक नव्हते पण येत्या मोसमात तो सामना पुन्हा आयोजित करायचा आमचा विचार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नितीची भारताशी (BCCI) तुलना केली तर फरक स्पष्ट दिसतो. भारताने बांगलादेशला कसोटी दर्जा मिळण्यासाठी मदत केली. अफगणिस्तानसाठी भारताची मैदाने ही गृहमैदाने जाहीर केली. कोविड- 19 च्या काळातही बीसीसीआयने एकसुध्दा दौरा रद्द केला नाही. दक्षिण आफ्रिकेच्या संघावरील बंदी उठल्यावर त्यांच्याविरुध्दची पहिली मालिका भारतानेच खेळली आणि त्यासाठी त्यांना भारतात आमंत्रित केले होते. श्रीलंकेला कसोटी दर्जा मिळण्याआधी त्यांच्यासोबतही भारतीय संघच नियमीत सामने खेळायचा.

याच्या उलट क्रिकेट ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वे, बांगलादेश व अफगणिस्तानविरुध्द खेळायचे नेहमीच टाळले आहे. आता दक्षिण आफ्रिकेत खेळायला नकार दिला आहे.

नीक हाॕकली यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे सर्वोत्तम वैद्यकीय सल्लागार आहेत. सर्वांना कोविड- 19बद्दलच्या आचारसंहितेची सवय झालेली आहे. धोक्यांचा त्यांनी अंदाज घेतला आहे आणि दुर्देवाने दक्षिण आफ्रिकेत सद्यस्थितीत आम्ही सामना केलेल्या परिस्थितीपेक्षा कितीतरी अधिक धोका आहे असे म्हणत त्यांनी दक्षिण आफ्रिका दौरा रद्द करण्याचे समर्थन केले आहे.

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटलेय की क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठी आम्ही ज्या उपाययोजना केल्या होत्या त्या अभूतपूर्व होत्या. त्यांचे समाधान करण्यासाठी ते यापेक्षा अधिक काही करू शकत नव्हते.जैव सुरक्षा वातावरणात सामने खेळवण्याची सर्व तयारी झाल्यावर शेवटच्या क्षणाला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेला नकार हा निराशाजनक असल्याचे क्रिकेट साऊथ आफ्रिकाने म्हटले आहे. अगदी त्यांच्या समाधानासाठी दक्षिण आफ्रिकन खेळाडूंनासुध्दा ऑस्ट्रेलियन संघाच्या आगमनाआधीच 14 दिवस क्वारंटीन ठेवायची तयारी त्यांनी केली होती त्यासाठी विद्यमान पाकिस्तान दौऱ्याहून मायदेशी परतण्याचा दक्षिण आफ्रिकन खेळाडूंचा कार्यक्रम त्यांना बदलावा लागणार होता. दक्षिण आफ्रिकेतच याआधी खेळल्या गेलेल्या इंग्लंड व श्रीलंकेविरुध्दच्या मालिकेसाठी असे नव्हते. यावेळी तर संघांचीही व्यवस्था ते वेगवेगळ्या हाॕटेलात करणार होतै. दोन्ही संघांचे जैव सुरक्षा क्षेत्रसुध्दा वेगवेगळे राहणार होते.एवढ्या सर्व उपायायोजना करुनही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेत खेळण्यासाठी नकार दिल्याने त्यांचे साधारण 26 लाख डाॕलरचे नुकसान होणार आहे, यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट आर्थिक अडचणीत येणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा यांनीसुध्दा देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचा दावा करतानाच दक्षिण आफ्रिकेला लससुध्दा उपलब्ध झाली असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणे 24 फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियन संघ तिकडे दाखल झाला असता तोवर दक्षिण आफ्रिकेतील बहुसंख्य आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होऊन गेलेले असते.

ही बातमी पण वाचा : दक्षिण आफ्रिकेचे ‘जशास तसे’ उत्तर, ऑस्ट्रेलियात खेळण्यास स्पष्ट नकार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER