राष्ट्रवादी नव्हे, आता भाजप ‘मराठ्यांचा पक्ष’

CM Fadnavis- Sharad Pawar

badgeपुण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठ्यांचा पक्ष असल्याची टीका करणाऱ्या एका निनावी पत्राने सध्या खळबळ आहे. मामला पुण्याचा असला तरी तमाम मराठ्यांना ते झोंबले आहे. यात कुणाचा हात असावा हे स्पष्ट झालेले नाही. पण राष्ट्र्वादीमधीलच असंतुष्ट ह्या पत्रामागे असावेत. अर्थात हा आरोप नवा नाही. १९९८ मध्ये शरद पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची वेगळी चूल मांडली तेव्हा बहुसंख्य मराठा नेते त्यांच्यासोबत होते. शरद पवार जातपात मानत नसले तरी मराठा नेत्यांना त्यांनी झुकते माप दिले हा इतिहास आहे. राष्ट्र्वादीतच नव्हे, काँग्रेसमध्येही काही अपवाद सोडला तर मराठेच तलवारी चालवत आले आहेत. विलासराव देशमुख अकाली गेले नसते तर आज महाराष्ट्र त्यांच्याच हातात असता. अशोक चव्हाण आदर्श सोसायटी घोटाळ्यातल्या वादात उडाले. पृथ्वीराज चव्हाण हेही मराठा आहेत. काँग्रेस वाचवण्याचे काम सध्या ज्यांच्याकडे देण्यात आले आहे ते अहमदनगर जिल्ह्यातले बाळासाहेब थोरात हेही मराठा आहेत. त्यामुळे मराठ्यांना पोसता म्हणून एकट्या राष्ट्रवादीला झोडपण्यात अर्थ नाही. सारेच राजकीय पक्ष कधी ना कधी मराठा नेतृत्वाच्या मोहात पडत आले आहेत.

गेल्या पाच वर्षांत तर राजकारण खूपच बदलले आहे. मराठा ही आता राष्ट्रवादी किंवा काँग्रेसची मक्तेदारी राहिलेली नाही. बहुतेक मराठे आणि त्यांचे मावळे भाजपच्या तंबूत केव्हाच दाखल झाले आहेत. भाजपच्या वाऱ्याला एकेकाळी चुकूनही न भटकणारे मराठे सरदार आज भगव्या हवेत मस्त रमले आहेत. भाजपचा आजचा तोंडवळा पाहिला तर राष्ट्रवादी नव्हे, भाजप मराठ्यांचा पक्ष झाला आहे. पुढची निवडणूक होऊन जाऊ द्या. भाजपमध्ये तुम्हाला पाटीलच पाटील दिसतील अशी भाजपमधल्या सोवळ्या नेत्यांना भीती आहे. ब्राह्मण मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली म्हणजे नेतृत्वात मराठे सरदार मोठमोठ्या मोहिमा जिंकत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब्राह्मण  आहेत; पण त्यांच्या सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे मराठा आहेत. भाजप हा आता भटजींचा पक्ष राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये झालेल्या मेगा भरतीत राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंहदादा मोहिते पाटील हे पाटलांचे पाटील भाजपमध्ये आले. राजकारण खऱ्या अर्थाने सेक्युलर होत आहे. सत्ता ही अजब चीज आहे. भल्याभल्यांना बदलवून टाकते. असे नसते तर काँग्रेसमध्ये तमाम आयुष्य घालवलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर कधी दिसले असते?