हिंदू असणं पाप आहे का?; गडकरींचा हल्लाबोल

नागपूर : हिंदू असणं पाप आहे का, असा सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शेजारील देशांमधील अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीवर भाष्य केलं. पाकिस्तानमध्ये आधी २२ टक्के हिंदू होते. आता तिथे केवळ ३ टक्के हिंदू वाचलेले आहेत. मग उर्वरीत १९ टक्के हिंदू गेले कुठं? अनेकांचे बळजबरी धर्मांतर करण्यात आले. महिलांवर अत्याचार झाले. पाकिस्तानात नागरिकांचे कोणत्याही प्रकारे संरक्षण केले गेले नसल्याचे गडकरी म्हणाले. नागपूर येथे आज सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला ते मार्गदर्शन करत होते.

यावेळी गडकरी म्हणाले की, महात्मा गांधी यांनी त्या नागरिकांना आश्वासन दिले होते, तुम्हाला ज्या दिवशी असुरक्षित असल्याचे वाटेल, तेव्हा तुम्ही चिंता करू नका, भारत तुम्हाला आधार देईल, असे महात्मा गांधी यांच्यासह पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभाई पटेल यांनी सांगितले होते. त्याच निर्वासितांना ७० वर्षांनंतर आमच्या सरकारने भारताचे नागरिकत्व प्रदान केले. मग आम्ही काय चुकीचे केले? काँग्रेसनं मुस्लिमांना केवळ व्होट मशीन मानलं. त्यामुळे त्यांच्याकडून सुरू असलेल्या अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले.

नागरिकत्व संशोधन कायदा धर्माच्या किंवा जातीच्या विरोधात नाही : फडणवीस

मुस्लिम नागरिकांना शरणार्थी म्हणून आश्रय देण्यासाठी जगात 100 ते 150 देश आहेत. मात्र हिंदू, बौद्ध, इसाई, पारशी लोकांसाठी कोणताही देश नाही, असं गडकरी म्हणाले. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधींनी शरणार्थींना संकटकाळी आधार देण्याचं आश्वासन दिलं होतं. आमचं सरकार तेच करतंय. शरणार्थींना नागरिकत्व देतंय. त्यात काय चुकलं, असा सवाल त्यांनी विचारला. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे मुस्लिमांवर कोणताही अन्याय होणार नाही. नवा कायदा अल्पसंख्यांक विरोधी नाही, असं गडकरींनी स्पष्ट केलं.

यावेळी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेसनं परदेशी लोकांसाठी रेड कार्पेट अंथरलं. व्होट बँकेसाठी त्यांनी राजकारण केलं. मात्र संघात कधीच द्वेष शिकवला नाही. मुस्लिमांना देशाबाहेर काढा असं कुणीही म्हटलेलं नाही. आम्ही धर्म न पाहता विकास करतो, असं गडकरी म्हणाले.

भारतानं कायम सर्वांना स्वीकारलं आहे. आपण विस्तारवादी नाही. रतन टाटा पारशी आहेत. तरीही देशानं त्यांचा स्वीकार केला. आपण कुठलाही भेदभाव करत नाही. आपल्या देशाच्या मुस्लिमांना सौदीमध्ये हिंदुस्तानीच म्हणतात. हिंदुत्व देशाची संस्कृती आणि ओळख आहे. आम्हाला कुणी सहिष्णुता शिकवू नये, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. व्हॉट बँकेसाठी काही पक्ष लोकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करत असल्याची टीका त्यांनी केली. अस्पृश्यता, जातीयवाद आम्हाला दूर करायचा आहे.

राम मंदिराची पहिली शिळा अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यानेच ठेवली आहे. हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व असल्याचं स्पष्ट करत गडकरींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा दाखला दिला. शिवरायांनी कधीच जातीय भेदभाव केलेला नाही. त्यांनी एकही मशीद तोडली नाही. तेच आमचे आदर्श आहेत, असं गडकरींनी सांगितलं.